

अमरावती, वृत्तसंस्था : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावरून औषधांचे व्यावसायिक
उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींविरोधात सोमवारी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वयेही (यूएपीए) नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले. शहर कोतवाली पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात 'यूएपीए'अंतर्गत कलम 16, 18 आणि 20 अन्वयेही गुन्हे दाखल केले. एका समुदायाला जरब बसविण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याने ही नवी कारवाई झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सात आरोपींपैकी अतीब रशीद याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. सहावा आरोपी डॉ. युसूफ खान हा पोलिस कोठडीत असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी इरफान खान याला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावती जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीरदखल घेतली आहे. राजकमल चौकात श्रद्धांजली भाजपतर्फे राजकमल चौकात उमेश कोल्हे हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हेंना शांततेत श्रद्धांजली वाहण्यात आली. आम्ही कोल्हे कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, असे मान्यवरांनी बोलून दाखविले. गुन्हेगारांची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. चिनी बनावटीचा चाकूही पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केला आहे चार व्हॉटस् अॅप ग्रुपची चौकशी तपास यंत्रणांनी अमरावतीतील चार व्हॉटस् अॅप ग्रुपची चौकशी सुरू केली आहे. ग्रुप अॅडमिन्ससह सदस्यांचीही चौकशी केली जाणार आहे. उमेश कोल्हे यांच्या पोस्टचा स्क्रीन शॉट या ग्रुप्समध्ये डॉ. युसूफ खान याने जाणीवपूर्वक फॉरवर्ड केला होता. विशेष म्हणजे, डॉ. युसूफ याला मित्र म्हणून कोल्हेंनी अनेकदा आर्थिक मदतही केली होती.