सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणात गोमेकॉवर दबाव कोणाचा? | पुढारी

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणात गोमेकॉवर दबाव कोणाचा?

पणजी; तेजश्री कुंभार : सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाला सध्या गंभीर वळण आले आहे. सिद्धी नाईक प्रकरणात शवविच्छेदन करताना अन्नांश आणि गुप्तांगातील स्वॅबचे नमुने ठेवले असल्याची माहिती गोमेकॉतील खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली होती. मात्र, तसे नमुने ठेवलेच नसल्याचे गोमेकॉतर्फे आता सांगितले जात आहे. गोमेकॉने हा युटर्न कोणाच्या दबावाखाली घेतला असावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत अधिकृतपणे काहीही न बोलण्यासाठीच्या सूचना वरिष्ठांनी डॉक्टरांना दिल्या आहेत. डॉक्टरांवर दबाव असल्याने हे वरिष्ठ कोण आहेत? आणि त्यांनी अशा सूचना का दिल्या आहेत? हे सांगायला सुद्धा डॉक्टर तयार नाहीत. या दरम्यान सिद्धीचे शवविच्छेदन एका कनिष्ठ डॉक्टरने केल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे.

विच्छेदन करण्यासाठी एखादे शव आणले की, त्यासंबधातील नियमावली तयार असते. सिद्धीचा मृतदेह आढळल्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी संपूर्ण गोव्यात वार्‍यासारखी पसरली होती. मृतदेह चिकित्सेला आल्यानंतर पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती घेण्याचे शवचिकित्सा विभागाचे काम होते. शिवाय योग्य त्या सूचना देणे हे पोलिसांचे सुद्धा कर्तव्य होते.

एका विभागाकडून जर हे काम करायचे राहिले असले तरी दुसर्‍या विभागाने सुद्धा हे काम करू नये? हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येईल? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित झाले आहेत.

शवचिकित्सा करणार्‍यांना पोलिसांनी अन्नांश आणि नमुने ठेवण्यासाठीची सूचना दिली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. इतका बेजबाबदारपणा करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यावर किंवा जबाबदारीचा भाग असणारे हे नमुने बाजूला न ठेवणार्‍या संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठीची मागणी जोर धरू लागली.

संबंधित प्रकारणाबाबत सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांची चुप्पी साधल्याने जबाबदारी घेणार कोण? आणि जबाबदारी झटकली कोणी? हा प्रश्न समोर येत आहे.

गोमेकॉ अधिकृत पत्रक काढणार का?

संबंधित प्रकरणानंतर गोमेकॉतील डॉक्टरांच्या भूमिकेविषयी पुन्हा शंका आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे गोमेकॉने या प्रकरणाबाबत माहितीवजा अधिकृत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

पाहा : साताऱ्याच्या रोहित ने चित्तथरारक रॅपलिंग करून सर केला शितकडा धबधबा

Back to top button