द्रौपदी मुर्मु यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलला आपल्याला मतदान करण्याचे आवाहन | पुढारी

द्रौपदी मुर्मु यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलला आपल्याला मतदान करण्याचे आवाहन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रपती निवडणुकीत आपणास पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुर्मु यांनी नंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांना दूरध्वनीवरून संवाद साधत केले.

येत्या १८ जुलैरोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होत असून रालोआ आघाडीच्या द्रौपदी मुर्मु यांची लढत विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुर्मु यांच्या अर्जाचे पेपर सेट निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांना सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच योगी आदित्यनाथ, शिवराजसिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, बसवराज बोम्मई, भुपेंद्र पटेल, हेमंत बिस्वा सरमा, पुष्करसिंग धामी, प्रमोद सावंत आणि एन. बीरेन सिंग हे भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व भाजपचे असंख्य खासदार उपस्थित होते.

भाजप नेत्यांशिवाय वायएसआर काँग्रेसचे व्ही. विजयसाई रेड्डी, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा हे रालोआ आघाडीत सामील नसलेल्या पक्षांचे नेते संसद भवनात अर्ज भरतेवेळी हजर होते. अण्णा द्रमुककडून ओ. पनीरसेल्वम तर संयुक्त जनता दलाकडून राजीव रंजन सिंग यांनी उपस्थिती लावली होती.

संबंधित बातम्या

हेही वाचलंत का ? 

Back to top button