Delta variant : लस घेतल्यानंतरही सोडत नाही डेल्टा व्हेरिएंट, अँटीबॉडीजची ताकदही कमी करतो! | पुढारी

Delta variant : लस घेतल्यानंतरही सोडत नाही डेल्टा व्हेरिएंट, अँटीबॉडीजची ताकदही कमी करतो!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट जास्त (Delta variant) संक्रामक आहे. डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) हा लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या दोन्ही लोकांना संक्रमित करतो. पण लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना या व्हेरिएंटच्या संक्रमणामुळे मृत्यूचा धोका कमी आहे, अशी माहिती एका अभ्यास अहवालातून समोर आली आहे.

याबाबतचा अभ्यास अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चेन्नईत केला आहे. हा अहवाल १७ ऑगस्ट रोजी जर्नल ऑफ इंस्‍पेक्‍शनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

डेल्टा अथवा B.1.617.2 व्हेरिएंट लसीकरण आणि लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये आढळून आला आहे. जगभरात हाच स्ट्रेन अधिक वेगाने फैलावला आहे. भारतातील दुसऱ्या लाटेच्या मागे हाच स्ट्रेन कारणीभूत आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

आयसीएमआरने अन्य अभ्यास अहवालाचादेखील संदर्भ दिला आहे. त्यात डेल्टा व्हेरिएंटच्या संक्रमणामुळे कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेणाऱ्या लोकांच्यातील अँटीबॉडीजची ताकद कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (ICMR-NIV) च्या डायरेक्टर डॉ. प्रिया अब्राहम यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा १३० हून अधिक देशात पसरला आहे. आम्ही लस घेतलेल्या लोकांमधील अँटीबॉडीजचा अभ्यास केला.

डेल्टा विरोधात अँटीबॉडीजची क्षमता दोन ते तीन पटीने कमी होते. तरीही लस व्हेरिएंटपासून संरक्षण देते.

कोरोना प्रतिबंधक लसी संक्रमणापासून वाचवू शकत नसल्या तरी यामुळे जीव मात्र वाचतो. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना गंभीर आजारपण आणि मृत्यूचा धोका कमी आहे. दोन्ही डोस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. पण एक डोस घेतलेल्या तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची पुष्टी अभ्यास अहवालात केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

Back to top button