Muslims girls marry : १६ वर्षांवरील मुस्‍लिम मुलगी आपल्‍या संमतीने लग्‍न करु शकते : पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालय | पुढारी

Muslims girls marry : १६ वर्षांवरील मुस्‍लिम मुलगी आपल्‍या संमतीने लग्‍न करु शकते : पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
१६ वर्षांवरील मुस्‍लिम मुलगी आपल्‍या पसंतीच्‍या तरुणाबरोबर संमतीने लग्‍न करु शकते, असे स्‍पष्‍ट करत याचिकाकर्त्या १६ वर्षांवरील मुलगी आणि तिच्‍या २१ वर्षांच्‍या पतीला पोलिसांनी आवश्‍यक ती सुरक्षा पुरवावी, असा आदेश पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालयाने  दिला आहे. ( Muslims girls marry )

सुरक्षा पुरविण्‍यासाठी नवदाम्‍पत्‍याची उच्‍च न्‍यायालयात धाव

संबंधित मुस्‍लिम दाम्‍पत्‍याने हरियाणा उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्‍हटलं होतं की, आम्‍ही आमच्‍या कुटुंबीयांच्‍या संमतीविना विवाह केला आहे. दोघांनी मुस्‍लिम धर्मानुसार विवाह केला असून, तरुणाचे वय २१ तर मुलीचे वय १६ आहे. मुस्‍लिम धर्मानुसार आमचा विवाह वैध आहे. संमतीविना विवाह केल्‍यामुळे आम्‍हाला आमच्‍या कुटुंबीयांकडून धोका असून, आम्‍हाला पोलीस सुरक्षा पुरविण्‍यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्‍यात आली होती.

Muslims girls marry : संबंधित दाम्‍पत्‍याचा विवाह वैध

या याचिकेवर एक सदस्‍यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती जसजित सिंग बेदी यांच्‍यासमोर सुनावणी झाली. न्‍यायमूर्ती बेदी यांनी स्‍पष्‍ट केले की, “मुस्‍लिम विवाह हे मुस्‍लिम पर्सनल लॉनुसार होतात. या कायद्‍यानुसार १५ वर्ष झालेले व्‍यक्‍ती ही विवाहास योग्‍य मानली जाते. संबंधित दाम्‍पत्‍याचा विवाह वैध आहे. १६ वर्षांवरील मुस्‍लिम मुलगी आपल्‍या संमतीने आवडत्‍या मुलाशी लग्‍न करु शकते.”
संबंधित १६ वर्षीय मुलगी व तिच्‍या पतीला आवश्‍यक ते पोलीस संरक्षण द्‍यावे, असे आदेशही उच्‍च न्‍यायालयाने पठाणकोट पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

२०१२ मध्‍ये दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयानेही ठरवला होता मुस्‍लिम मुलीचा विवाह वैध

मुस्‍लिम मुलीचे वय १५ वर्षांच्‍या पुढे असेल आणि तिच्‍या पसंतीविरुद्‍ध तिचा विवाह केल्‍यास ती न्‍यायालयात दाद मागू शकते. यापूर्वी २०१२ मध्‍ये दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयानेही १५ वर्षांच्‍या वरील मुलीने स्‍वत:च्‍या मर्जीने विवाह केल्‍याप्रकरणी निर्णय देताना म्‍हटलं होतं की, मुस्लिम कायद्यानुसार वयात आलेल्या मुलीचे लग्न करता येते. या वयातील मुलगी आपल्‍या इच्‍छेनुसार लग्‍न करु शकते. हा विवाह रद्‍द करावा, अशी मागणी करणारी याचिका फेटाळत न्‍यायालयने हा विवाह वैध असल्‍याचे स्‍पष्‍ट करत संबंधित मुलीस तिच्‍या पतीबरोबर राहण्‍याची परवानगी दिली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button