नाशिक : महिला पाय घसरून 100 फूट खोल दरीत पडली ; अन् पुढे जे घडलं… | पुढारी

नाशिक : महिला पाय घसरून 100 फूट खोल दरीत पडली ; अन् पुढे जे घडलं...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चामरलेणी परिसरात रविवारी (दि. 19) सकाळी आठच्या सुमारास फिरण्यासाठी आलेली पर्यटक महिला पाय घसरून तब्बल सुमारे 100 फूट खोल दरीत पडली होती. या पर्यटक महिलेसाठी दोन डॉक्टर देवदूत बनून येत जीवदान दिले अन्यथा तिच्यावर जीवावर बेतले असते. या अपघातात त्या महिलेच्या हातापायाला जखमा व फ्रॅक्चर झाले असून, तिचा जीव वाचल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

चामरलेणी डोंगर परिसरात अनेक जण रोज फिरावयास जातात. वीकेण्डला पर्यटकांसह सर्वसामान्यांची जास्तच गर्दी असते. इथे अनेक जण पायर्‍या चढून लेणीपर्यंत जातात, तर काही जण अर्ध्या पायर्‍या चढून गेल्यावर असलेल्या पायवाटेने संपूर्ण टेकडीला चक्कर मारतात. ही पायवाट अतिशय अरुंद आहे. जराही लक्ष विचलित झाले, तरी बाजूला खोल दरीत कोसळण्याची भीती असते. याच वाटेवरून जात असताना शहरातील एक महिला सुमारे 100 फूट दरीत कोसळली. त्या महिलेसोबतच्या पुरुषाला काय करावे सुचेना.
त्याच वेळी या वाटेने नाशिकमधील डॉ. रविकिरण निकम आणि डॉ. गणेश शिंदे हे फिरून चालले होते.

त्या पुरुषाने महिला दरीत पडल्याचे सांगताच दोन्ही डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता, दरीत उतरले. बेशुद्ध झालेल्या त्या महिलेला डॉक्टरांनी त्वरित प्राथमिक उपचार देत शुद्धीवर आणले. इतर फिरणार्‍या नागरिकांच्या मदतीने महिलेला दरीतून वर आणून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉ. निकम आणि डॉ. शिंदे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्या महिलेचे प्राण वाचल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

Back to top button