सोलापूर शहरात कोरोनाचे 24 सक्रिय रुग्ण | पुढारी

सोलापूर शहरात कोरोनाचे 24 सक्रिय रुग्ण

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा गत अनेक महिने कोरोनामुक्त असलेल्या सोलापूर शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) रुग्णसंख्या रविवारी 24 इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढती संख्या ही शहरासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. मास्कमुक्तीमुळे कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचा अंदाज आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आदी शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनामुक्त समजले जाणार्‍या सोलापूर शहरात प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने मास्क वापरणे ऐच्छिक केल्यावर जवळपास 99 टक्के शहरवासीयांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंद केलेे. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा अंदाज आहे. शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 19 इतकी होती. रविवारी त्यामध्ये 5 जणांनी भर पडून सक्रिय रुग्णसंख्या 24 वर पोहोचली. यामध्ये 11 पुरुष व 13 स्त्रियांचा समावेश आहे.

चाचण्या वाढविल्याचा परिणाम

राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सोलापूर शहरात मनपाने खबरदारीचा उपाय म्हणून लक्षणे असलेल्या रुग्णांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button