Covid-19 update | देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार, २४ तासांत १२,२१३ नवे रुग्ण
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात १०९ दिवसानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,२१३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७,६२४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्या ५८,२१५ वर पोहोचली आहे. गुरुवारी पॉझिटिव्हिटी रेट २.३५ टक्के होता.
मंगळवारी दिवसभरात ८ हजार ८२२ रुग्ण आढळले होते. तर, १५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ५ हजार ७१८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६६ टक्क्यांवर घसरला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर २.३५ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९५ कोटी ६७ लाख ३७ हजार १४ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.५३ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ९६ लाख ७० हजारांहून अधिक बुस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १३ कोटी ४० लाख ४ हजार ९३५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८५ कोटी ५८ लाखांहून अधिक कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ कोटी ४० लाख २७८ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत ३६ टक्क्यांनी वाढ
मुख्यतः महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर केरळमध्ये गेल्या सात दिवसांपासून दर दिवशी १,९५० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे ४,०२४ नवे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात बुधवारी आढळून आलेली रुग्णसंख्या ही १२ फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक आहे. १२ फेब्रुवारी रोजी येथे ४,३५९ रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य विभाग पुन्हा सतर्क
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन या व्हायरसचे व्हेरिएंट आढळून येत आहेत, त्यामुळे राज्यात अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रात वाढत आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर हा आजच्या दिवसाला ४० टक्क्यांवर गेल्यामुळे या रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. राज्यात रुग्णवाढ जरी होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला असून 'हर घर दस्तक' या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत, असेही राजेश टोपे म्हणाले.