जेवणाबरोबर फळांचे सेवन करु नका, आरोग्यावर होईल ‘हा’ परिणाम | पुढारी

जेवणाबरोबर फळांचे सेवन करु नका, आरोग्यावर होईल 'हा' परिणाम

जेवल्यानंतर लगेच फिरायला जाणे, चहा पिणे किंवा धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक होऊ शकते. काही सवयी जेवणानंतर हानिकारक ठरून आरोग्य बिघडू शकते.

आहार हा निरामय जीवनासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. आहार कसा असावा, याबाबत जसे काही नियम किंवा संकेत आहेत, तसेच आहार कसा घ्यावा याबाबतही आहेत. इतकेच नव्हे तर आहार ग्रहणानंतर म्हणजेच जेवणानंतरही काय करावे, काय करू नये यासंबंधीचे काही अलिखित नियम आहेत. यातील पहिले दोन नियम म्हणजेच आहाराची पोषकता आणि आहारग्रहणाची पद्धती पाळली जाते; पण जेवणानंतरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.

वास्तविक पाहता, जेवण झाल्यानंतर खानपान करणे टाळले पाहिजे. याखेरीज अन्य काही सवयीही हानिकारक ठरू शकतात. याची माहिती बहुतेकांना नसते किंवा कमी लोकांनाच याची जाणीव असते. काही लोकांना या सवयी धोकादायक असल्याचे जाणवते. मात्र, त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम नंतर त्यांना भोगावा लागतो. जेवणानंतर कोणत्या सवयी ठरतात धोकादायक ते पाहूया.

धूम्रपान करू नये : धूम्रपान तसेही आरोग्यासाठी धोकादायकच आहे; पण जेवणानंतर मात्र लगेचच धूम्रपान करणे नक्कीच टाळावे. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेचच सिगारेट ओढल्यास पचनासंबंधी समस्या निर्माण होतात. धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची सवय असलेल्या लोकांना जेवणानंतर त्याची तल्लफ येतेच. मात्र, या गोष्टी टाळाव्यात. कारण, जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढल्यास गॅस्ट्रिक आणि पित्त यांची समस्या भेडसावते.

फळे खाऊ नयेत : जेवणाबरोबर फळांचे सेवन केल्यास ते जेवणाबरोबर जठरात अडकते आणि योग्य वेळेपर्यंत आतड्यांमध्ये पोहोचत नाही. त्यामुळे आरोग्य बिघडते आणि पोटातील अन्न दूषित होते. त्यासाठी सल्ला दिला जातो की, जेवणानंतर किंवा जेवणाआधी एक तास फळे खावीत.

चहाचे सेवन टाळावे : चहाच्या पानात भरपूर प्रमाणात अ‍ॅसिडचे प्रमाण असते. त्यामुळे आहारातील प्रथिनांचे नुकसान होते. परिणामी, अन्न पचण्यामध्ये खूप त्रास होतो. जेवल्यानंतर चहा प्यायचाच असेल तर किमान एका तासाने प्यावा.

अंघोळ नको : जेवण झाल्यानंतर लगेचंच अंघोळ करू नये. जेवल्या जेवल्या अंघोळ केल्यास रक्तप्रवाह हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांत वाढतो. पोटाच्या आजूबाजूचा रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे पचनसंस्था कमजोर होते.

लगेच चालणे टाळा : चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच; पण जेवण झाल्याबरोबर चालायला जाऊ नये. त्यामुळे पोटातील आम्ल घशाशी येते आणि अपचनाची समस्या भेडसावते. परदेशातील एका विद्यापीठातील विज्ञान विभागाच्या संशोधकाच्या मते, जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने शतपावली करणे उत्तम किंवा चालणेही उत्तम.

लगेच झोपू नका : जेवण झाल्याबरोबर झोपायला जाण्याची अनेकांना सवय असते. मात्र, त्यामुळे अन्नपचन होत नाही. त्यामुळे गॅसेस आणि आतड्यांमध्ये संसर्ग होण्याची समस्या निर्माण होते.

– डॉ. मनोज कुंभार

Back to top button