आरोग्य : पुन्हा कोरोनाचे सावट

Corona Update
Corona Update
Published on
Updated on

दोन वर्षांपूर्वी कोव्हिड विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षे कोव्हिडसोबत जगावे लागणार, असे विषाणूतज्ज्ञांकडून सांगितले जात होते. तथापि, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातील म्युटेशन सुरूच असते. त्यातून नवे व्हेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन व्हेरियंटस्मुळे कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे.

आठ जून रोजी कोरोनाचे देशात चोवीस तासांत पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. देशात अजूनही 28 हजार रुग्णांंवर उपचार सुरू आहेत. हा आकडा धोकादायक नाही. परंतु महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांत बीए-4 आणि बीए-5 व्हेरियंट आढळून आल्याने काळजी वाढली आहे. अर्थात, हे दोन्ही व्हेरियंट नवीन लक्षणांमध्ये गणले जात नाहीत आणि त्याचा गंभीर आजाराशीदेखील संबंध नाही. ओमायक्रॉननंतरचा नवीन व्हेरियंट म्हणून त्याकडे पाहता येऊ शकेल. मात्र या नव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

कारण हे दोन्ही व्हेरियंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आले होते आणि तेव्हाच ते मोठ्या प्रमाणावर संक्रमण करणारे आहेत, असे लक्षात आले होते. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात उत्तरेकडील भागात असणार्‍या लिम्पोपो येथे या व्हेरियंटचा उगम झाल्याचे समोर आले. तेथेे लोकसंख्या खूप कमी आहे. आतापर्यंत बहुतांश नवे व्हेरियंट हे शहरी भागातच आढळले आहेत, ही बाब लक्षात घ्यायला हवी. बीए-5 हा पहिल्यांदा 25 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्वेकडील जुलू-नताल या भागात आढळून आला. परंतु आज तो दक्षिण आफ्रिकेतील अन्य प्रांतातदेखील पसरला आहे. यावरून याची संक्रामक क्षमता अधिक असल्याचे स्पष्ट होते.

विषाणू आणि त्यांच्या नवनव्या व्हेरियंटस्चे आकलन करताना त्यांची संक्रमणक्षमता आणि घातकपणा हे दोन निकष महत्त्वाचे ठरतात. विषाणूतज्ज्ञांच्या मते बहुतेकदा संक्रमण अधिक वेगाने करणारे विषाणू तितक्या प्रमाणात घातक नसतात. त्यामुळेच अशा विषाणूंचा संसर्ग होणार्‍यांमध्ये मृत्यूदर कमी आढळतो. अर्थातच, हे ठोकताळे असतात. त्यांना मागील काळातील अभ्यासाची जोड असली तरी प्रत्येक वेळी तशीच स्थिती राहील, असे ठोसपणाने सांगता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर आपल्याला या नव्या व्हेरियंटस्ची लागणक्षमता आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत बीए-4 व्हेरियंट रुग्णांची टक्केवारी जानेवारी 2022 मध्ये एक टक्‍का असताना ती एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 35 टक्क्यांपर्यंत पोहोचली. एप्रिलच्या शेवटपर्यंत बीए-5 संसर्गबाधित रुग्णांचे प्रमाण 20 टक्के होते. यानुसार हा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरतो, असे लक्षात येते.

दक्षिण आफ्रिकेत जानेवारीतच ओमायक्रॉनमुळे चौथी लाट आली आणि आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी बीए-4 आणि बीए-5 चे वाढते प्रमाण पाहता पाचव्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे भारतातही ओमायक्रॉनच्या रूपातून आलेल्या तिसर्‍या लाटेनंतर आता चौथी लाट येऊ शकते, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याद‍ृष्टीने केंद्रीय यंत्रणांबरोबरच राज्य सरकारांच्या आरोग्य यंत्रणाही तयारीला लागल्या आहेत. कोव्हिड चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन स्थिती ओढावल्यास ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठीही आरोग्य प्रशासन कामाला लागले आहे. मुळातच ऋतू बदलांच्या काळात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. कोव्हिड विषाणू संसर्गानंतर उद्भवणारी लक्षणेही याच धाटणीची असल्यामुळे बहुतेक जणांचे त्याकडे दुर्लक्ष होते. पण हे दुर्लक्षच संक्रमण वाढीस हातभार लावणारे ठरते. मुळातच आरोग्यशास्त्रानुसार कोणत्याही रोगाचे निदान जितक्या लवकर होईल, तितके त्याच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. कोव्हिड संक्रमणाच्या मागील तीन लाटांमध्येही ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे.

आज कोव्हिड प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोस मिळाल्यामुळे भारतीय नागरिकांचे सुरक्षा कवच हे दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारक शक्‍ती चांगली आहे. त्यामुळेच पहिल्या किंवा दुसर्‍या लाटेप्रमाणे भारताची स्थिती ढासळणार नाही, हे निश्‍चित आहे. पण तरीही नागरिकांनी खबरदारीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तसेच याबाबत शासन यंत्रणांनीही सजग राहणे गरजेचे आहे. सततच्या लाटांमुळे कोव्हिडबाबत समाजात गांभीर्यभाव कमी झाला आहे. परंतु हलगर्जीपणाचा परिपाक कोरोनाची नवीन लाट येण्यात होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

सद्य:स्थिती पाहता, कोरोनाची तपासणी पूर्वीसारखीच काटेकोरपणे होत आहे की नाही, यावर आगामी स्थिती अवलंबून असणार आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच लोकांनी तपासणीबाबत टाळाटाळ करू नये आणि त्या यंत्रणेतही त्रुटी राहता कामा नयेत.

विषाणूंचे संक्रमण ही एक नैसर्गिक प्रक्रियेतील घटना आहे. विषाणूंच्या विश्‍वाचा आणि त्यांच्यात होणार्‍या बदलांचा अभ्यास व संशोधन आजही सुरू आहे. त्यामुळेच त्याबाबत भविष्यातील भाकिते वर्तवणे हे तितकेसे सोपे नाही. म्हणूनच ही चौथी लाट आहे का? पाचवीदेखील येईल का? या प्रश्‍नांची उत्तरे ठोसपणाने सांगता येणार नाहीत. एक गोष्ट निश्‍चित की, कोरोना संसर्ग हा कमी झालेला असला तरी तो पूर्णपणाने थांबणार नाही. त्याच्या स्वरूपात बदल होत आहे आणि जोपर्यंत स्वरूप बदलत राहील, तोपर्यंत चिंता कायम राहील. विषाणू हे निसर्गसाखळीतील एक घटक आहेत. त्यांचे अस्तित्व मानव पुसून टाकू शकत नाही. त्यामुळे आपण केवळ बचावात्मकतेवर अधिक भर देणे आवश्यक आहे. यासाठी काळानुसार लसीकरणात आणि उपचारात सुधारणा करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोना स्थितीचे गांभीर्य वाढणार नाही.

भारतात लसीकरण मोहीम यशस्वी झाली असून, याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. पण आता नव्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बुस्टर डोस घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, या आघाडीवर सध्या जराही उत्साहवर्धक वातावरण दिसत नाही. कोरोना विरोधाच्या लढाईत ही शिथिलता जोखमीची ठरू शकते. कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना किती समर्थपणे करतो, यावरच आपला पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे. आपण बदलत्या संसर्गाला ओळखू शकतो. म्हणूनच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सरकारी प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत मदत करायला हवी. पर्यवेक्षण, तपासणी, निदान आणि संशोधन यावर लक्ष केंद्रित करतच आगामी वाटचाल करावी लागणार आहे.

डॉ. महेश बरामदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news