राष्‍ट्रपती निवडणूक : संयुक्‍त उमेदवार देण्‍याबाबत सोनिया गांधी सकारात्‍मक | पुढारी

राष्‍ट्रपती निवडणूक : संयुक्‍त उमेदवार देण्‍याबाबत सोनिया गांधी सकारात्‍मक

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
राष्‍ट्रपती पदाच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्‍यानंतर विरोधी पक्षांच्‍या हालचाली गतीमान झाल्‍या आहेत. काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍याबरोबर चर्चा केली. यानंतर त्‍यांनी एक निवेदन प्रसिद्‍ध करत या निवडणुकीसाठीची पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट केली.

सोनिया गांधी यांनी म्‍हटलं आहे की, देशाला आज अशा राष्‍ट्रपतींची गरज आहे की, जे भारतीय राज्‍यघटना, घटनात्‍मक
संस्‍था आणि देशातील नागरिकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करु शकतील. काँग्रेस पक्षाकडून राष्‍ट्रपती पदाच्‍या निवडणुकीसाठी उमेदवार म्‍हणून कोणाचेही नाव अद्‍याप सुचवलेले नाही. आपण सर्वांनी देशातील जनतेच्‍या हितसाठी भारतीय राज्‍यघटनेचे संरक्षण करणार्‍या व्‍यक्‍तीची निवड होणे आवश्‍यक आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

देश आणि देशातील नागरिकांच्‍या हितासाठी आता सर्वांनी आपले मतभेदांच्‍याही पलिकडे जावून विचार करण्‍याची वेळ आली आहे. यासंदर्भात खुली चर्चा होणे आवश्‍यक आहे. राष्‍ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष अन्‍य राजकीय पक्षांबरोबर चर्चा करण्‍यास तयार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. त्‍यामुळे राष्‍ट्रपती पदाच्‍या निवडणुकीचे काँग्रेसचे समन्‍वयक म्‍हणून राज्‍यसभा विरोधी पक्ष नेते मल्‍लिकार्जुन खर्गे असतील, असेही सोनिया गांधी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button