राज्यसभा निवडणूक : राजस्थानमधील चार पैकी तीन जागांवर काँग्रेस विजयी | पुढारी

राज्यसभा निवडणूक : राजस्थानमधील चार पैकी तीन जागांवर काँग्रेस विजयी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  राजस्थान मधील सत्ताधारी काँग्रेसने राज्यातील राज्यसभेच्या चार पैकी तीन जागांवर विजयी मिळवला आहे. तर, भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. काही तांत्रिक कारणामुळे मतमोजणीला विलंब झाला होता. काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी तसेच रणदिप सुरजेवाला विजयी झाले. तर, भाजपचे उमेदवार माजी मंत्री घनश्याम तिवाडी विजयी झाले. भाजप समर्थीत अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा निवडणुकीत पराभव झाला.

सुरजेवाला यांना ४३ मत, वासनिक यांना ४२ मत मिळाली. वासनिक यांच्या खात्यातील एक मत रद्द ठरवण्यात आले. तर, घनश्याम तिवाडी यांना ४३ मत मिळाली. तर, भाजप उमेदवार प्रमोद तिवारी यांच्या पारड्यात ४१ मत पडली. डॉ.सुभाष चंद्रा यांना ३० मत मिळाली.

५७ पैकी ४१ उमेदवार बिनविरोध

उत्तर प्रदेशमधून ११ जागा बिनविरोध निवडून आल्या. निवडून आलेल्या ११ खासदारांपैकी ८ भाजपाचे आणि तीन सपाचे आहेत. भाजपाकडून लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधामोहनदास अग्रवाल, महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा दर्शना सिंह, संगीता यादव, बाबुराम निषाद, राज्यसभा सदस्य सुरेंद्र कुमार नागर, डॉ. के. लक्ष्मण आणि माजी खासदार मिथिलेश कुमार यांचा या यादीत समावेश आहे. त्याचवेळी, सपा आघाडीकडून, सपाकडून राज्यसभा सदस्य जावेद अली, आरएलडीचे जयंत चौधरी आणि सपाला पाठिंबा असलेले कपिल सिब्बल यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशातील चार जागांवर निवडून आलेले सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत. यामध्ये विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णय्या आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे. बिहारमधून पाच जागांवर मतदान न करता खासदार निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाला दोन, आरजेडीला दोन आणि जेडीयूला एक जागा देण्यात आली आहे. भाजपाकडून सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, जेडीयूकडून खिरू महतो तर आरजेडीकडून मीसा भारती आणि फयाज अहमद राज्यसभेचे खासदार बनले आहेत.

तेलंगणात दोन जागांवर टीआरएसचे बी. पार्थसारधी रेड्डी आणि डी. दामोदर राव. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन बिनविरोध निवडून आले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला दोन्ही जागा मिळाल्या. येथून बलबीर सिंह सीचेवाल आणि विक्रमजीत सिंह साहनी राज्यसभेत पोहोचले. झारखंडमध्ये महुआ माझी एक जागा आणि एक जागा भाजपच्या आदित्य साहू यांच्या बाजूने गेली. उत्तराखंडमधील भाजपाच्या उमेदवार डॉ. कल्पना सैनी राज्यसभेत पोहोचल्या आहेत.

तामिळनाडूतून सहा खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये डीएमकेकडून एस कल्याणसुंदरम, आर गिरीराजन आणि केआरएन राजेश कुमार अशी तीन नावे आहेत. एआयएडीएमकेकडून सीव्ही षणमुगम आणि आर धरमार तर काँग्रेसकडून पी चिदंबरम निवडून आले आहेत. मध्य प्रदेशात भाजपला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी भाजपाकडून तर विवेक तनखा काँग्रेसकडून निवडून आले. ओडशातील तीनही जागा बीजेडीच्या बाजूने गेल्या आहेत. त्यात सुलता देव, मानस रंजन मंगराज आणि सस्मित पात्रा आहेत.

हेही वाचा

Back to top button