कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी त्यांनी ट्विट केल्या आहेत.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा ।
परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा ।
फजित तो खोटा शीघ्र होय ll
– जगद्गुरु संत तुकाराम महाराज
याचा अर्थ असा की वाघाचे पांघरूण घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. या ओळीतून संभीजीराजेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
काल शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान संभाजीराजेंनी ट्विट करत, 'कोल्हापूरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे कोल्हापूरचाच खासदार होणार.' असे म्हटले होते.
दरम्यान, राज्यसभा निकालानंतर संभाजीराजेंनी मराठा समन्वयकांची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या कोल्हापुरात बोलावली असून त्यात संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याचे समजते.
शिवसेनेसोबत वाटावाटी निष्फळ ठरल्यानंतर संभाजाराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. पण खासदारकी द्यायची आणि पक्षाशी एकनिष्ठही राहायचे नाही ही त्यांची फटकून राहणारी कार्यपद्धती आधी भाजपला पटली नव्हती. त्यानंतर ती शिवसेनेलाही पटणारी नव्हती. त्यामुळेच संभाजीराजेंनी केलेल्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या. शिवसेनेने संभाजीराजेंसोबत तहाचा मसुदाही तयार केला. पण अविश्वासाच्या वातावरणात झालेला हा तह अवघ्या काही तासांतच मोडीत निघाला आणि संभाजीराजेंना माघार घेणे भाग पडले होते.
हे ही वाचा :