COVID19 | महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही चिंता वाढली, देशात कोरोनाचे २४ तासांत ५,२३३ नवे रुग्ण | पुढारी

COVID19 | महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही चिंता वाढली, देशात कोरोनाचे २४ तासांत ५,२३३ नवे रुग्ण

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,२३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या २८,८५७ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३,३४५ रुग्णांनी कोरोवार मात केली आहे. देशाचा कोरोनामुक्ती दर ९८.७२ टक्के आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकतही रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

याआधीच्या दिवशी देशात ३,७१४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात पुन्हा आता वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत ८० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सोमवारी ६७६ रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी हा आकडा १,२४२ वर पोहोचला. तब्बल चार महिन्यांनंतर मुंबईतील रुग्णसंख्येने १ हजाराचा आकडा पार केला आहे. याआधी २९ जानेवारी रोजी मुंबईत एका दिवशी १,४११ रुग्णांची नोंद झाली होती.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अधिक चाचण्यांमुळे अधिक रुग्णांची नोंद होत असल्याचे म्हटले आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी चौथ्या लाटेची भिती नसल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. मंगळवारी ठाण्यात १५३ आणि नवी मुंबईत १०८ रुग्णांची नोंद झाली होती. पुण्यात ८२ रुग्ण आढळून आले होते.

महाराष्ट्रानंतर कर्नाटकतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कर्नाटकात तीन महिन्यांनंतर गेल्या २४ तासांत ३४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Back to top button