मुंबईला पुन्हा कोरोना धोका! | पुढारी

मुंबईला पुन्हा कोरोना धोका!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला पुन्हा कोरोना धोका असल्याची भीती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरांत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता पालिकेच्या सर्वच विभागांत रुग्णवाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासह विभाग कार्यालयांचे टेन्शन वाढले आहे.

बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, मालाड आदी भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना, आता दक्षिण मुंबईतील फोर्ट विभागातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अवघ्या तीन नगरसेवक असलेल्या ए विभागात गेल्या सात दिवसांत 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रँटरोड डी विभागात येणार्‍या मलबार हिल, पेडर रोड, ताडदेव आदी भागातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांत या विभागांत सुमारे 350 रुग्णांची नोंद झाली.

चंदनवाडी सी विभाग व डोंगरी बी विभागात कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला होता. मात्र येथेही पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. अंधेरी पश्चिमेला तर दररोज 80 ते 130 रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वच विभाग कार्यालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये ज्या पद्धतीने विभाग कार्यालयांमध्ये उपाययोजना राबविण्यात आल्या त्याच धर्तीवर पुन्हा उपाययोजना राबविण्यात याव्यात. यात सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. रुग्ण वाढत असलेल्या भागात जाऊन तेथील नागरिकांची तपासणी करण्यात यावी, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना तातडीने अलगीकरणमध्ये हलविण्यात यावे, असे निर्देशही देण्यात आले आहे.

मुंबईत 676 नवे कोरोना रुग्ण

मुंबईत कोविड रुग्णांच्यासंख्येत वाढ़ होत असताना सोमवारी दिवसभरात झालेल्या 6 हजार 897 कोविड चाचण्यांमधून 676 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 318 रुग्ण बरे झाले असून एकाचाही मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 5238 इतकी नोंदविण्यात आहे. तर, दिवसभरात रुग्णालयामध्ये 54 रुग्णांना दाखल करावे लागले. तर पाच जणांना ऑक्सिजनची आवश्यकता लागली. सापडलेल्या रुग्णांपैकी 622 रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती.

Back to top button