हार्दिक पटेल : मोदींच्‍या गुजरातमध्‍ये ‘उपद्रव मूल्‍य’ दाखवणारा ‘पाटीदार’ नेता | पुढारी

हार्दिक पटेल : मोदींच्‍या गुजरातमध्‍ये 'उपद्रव मूल्‍य' दाखवणारा 'पाटीदार' नेता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजकारणात यशस्‍वी होण्‍यासाठी तुमचं उपद्रव मूल्‍य किती? यालाही फार महत्त्‍व असतं. यावर राजकीय नेत्‍याचा प्रवास ठरतो. ही राजकारणातील वस्‍तुस्‍थिती गुजरातमधील युवा नेता हार्दिक पटेल यांनी सात वर्षांपूर्वीच हेरली होती. अवघ्‍या सात वर्षांमध्‍ये पाटीदार आरक्षण आंदोलन ते राष्‍ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्‍यक्षपद भूषविण्‍यापर्यंतचा त्‍यांचा राजकीय प्रवास थक्‍क करणारा आहे. त्‍यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनााचे युवकाचे नेतृत्‍व करत गुजरात सरकारसह केंद्र सरकारला आव्‍हान दिले. आरक्षण आंदोलनानंतर काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. आता काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदाचा राजीनामा देत पुन्‍हा नवी इनिंग खेळण्‍यासाठी ते सज्‍ज झाले आहेत. जाणून घेवूया हार्दिक पटेल यांच्‍या राजकीय प्रवासाविषयी…

आरक्षण प्रश्‍नाने तयार केलेले नेतृत्त्‍व

हार्दिक पटेल यांचा जन्‍म २० जुलै १९९३ रोजी पाटीदार कुटुंबात झाला. त्‍यांचे मूळ गाव हे अममदाबादनजीक वीरमगाम तालुक्‍यातील चंद्रनगर आहे. कॉमर्स शाखेत त्‍यांनी पदवी घेतली. सामाजिक कार्याच्‍या माध्‍यमातून ते पाटीदार समाजासाठी रस्‍त्‍यावर उतरले. एक महिन्‍यात ते विरंगम युनिटचे अध्‍यक्षपद त्‍यांनी भूषवले.

६ जुलै २०१५ रोजी हार्दिक यांनी पाटीदार आंदोलनाची हाक दिली. पाटीदार अनामत आंदोलन समितीची त्‍यांनी स्‍थापना केली. काही दिवसांमध्‍ये पटेल समुदायाच्‍या निवृत्त अधिकार्‍यांची त्‍यांना साथ मिळाली. ऑगस्‍ट २०१५ मध्‍ये केवळ २२ व्‍या वर्षी त्‍यांनी सूरतमध्‍ये ५ लाखांहून अधिक पटेल समाजाची लोकांना एकत्रीत केले. त्‍यांच्‍या वतृत्त्‍वाचा प्रभाव तरुणाई पडू लागला. २०१५ या वर्षात त्‍याने गुजरातमध्‍ये ८० हून अधिक सभा घेतल्‍या.

गुजरातमधील प्रभावी समाज अशी ओळख असणार्‍या पाटीदार समाज आरक्षण मागणीसाठी आक्रमक झाला. २५ ऑगस्‍ट २०१५ रोजी पाटीदार आरक्षण समर्थकांनी अहमदाबादमध्‍ये जीएमडीसी मैदानात महारॅलीचे आयोजन केले होते. राज्‍य सरकारने या सभेला परवानगी नाकारत हार्दिक पटेल यांना अटक केली. पाटीदार आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनावेळी झालेला हिंसाचारामुळे राज्‍य सरकारने हार्दिक पटेल यांच्‍यावर देशद्रोहचा गुन्‍हा दाखल केला. या आंदोलानमुळे हार्दिक पटेल यांचे नाव देशभर झाले.

पटेल समुदाय हा गुजरातमधील मोठी व्‍हॉट बँक आहे. यावेळी हार्दिक पटेल यांच्‍या नेतृत्‍वाखालील आंदोलन भाजपविरोधात होते. त्‍यामुळे राज्‍य सरकारने हार्दिक यांच्‍याविरोधात कडक कारवाई केली. हार्दिक हे काँग्रेसला मदत करत आहेत, असा आरोप भाजपचे नेते करत राहिले. मात्र हार्दिक यांनी सर्व आरोप फेटाळत आपले आंदोलन केवळ आरक्षणासाठी असल्‍याचा दावा करत राहिले.

भाजपला केले टार्गेट, काँग्रेसला पाठिंबा

पाटीदार आरक्षणावर ठोस निर्णय न झाल्‍याने हार्दिकने भाजपला टार्गेट केले. २०१७ विधानसभा निवडणूक रिंगणापासून ते लांबच राहिले. त्‍यांनी काँग्रेसला समर्थन देण्‍याचे आवाहन केले. यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्‍यासह गुजरात काँग्रेसमधील नेते त्‍यांच्‍यावर सुस्‍तिसुमने उधळू लागले. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीला पाटीदार आंदोलनाचा काँग्रेसला फायदा झाला. काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्‍हान निर्माण केले. भाजप सत्तेत राहिले मात्र आमदारांची संख्‍या कमी झाली. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्‍यांना पक्षाचे
स्‍टार प्रचारक केले. यानंतर हार्दिक यांनी गुजरातमध्‍ये भाजपविरोधात मोर्चा उघडला.

अश्‍लील सीडी लीकमुळे गुजरातसह देशात खळबळ

हार्दिक पटेल आणि वाद हे गुजरातमध्‍ये समीकरणच झाले होते. नोव्‍हेंबर २०१७ मध्‍ये हार्दिक पटेलची एक तरुणीबरोबरची अश्‍लील सीडी लीक झाली. हा कट भाजपने रचल्‍याचा आरोप हार्दिक यांनी केला. मला राजकारणातून उद्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी हा कट रचल्‍याचा दावाही त्‍याने केला होता. सीडी लीक झाल्‍यानंतर पाटीदार समाजातील नेत्‍यांनी हार्दिक विरोधात भूमिका घेतली. काही काळ या सीडी प्रकरणाची गुजरातच्‍या राजकारणात जोरदार चर्चा झाली.

काँग्रेसमध्‍ये प्रवेश …. थेट प्रदेशाध्‍यक्षपदी वर्णी

गुजरातमधील राजकारणाच्‍या इमारतीत प्रवेश करण्‍यासाठी हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनाची शिडी वापरली. २०१९लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. ते लोकसभा निवडणूक लढविणार होते. मात्र या काळात त्‍यांच्‍यावर अनेक गुन्‍हे दाखल होते. त्‍यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर हार्दिक यांना पुन्‍हा एकदा अटक झाली. सत्ताधार्‍यांना विरोध हाच त्‍याच्‍या राजकारणातील पाया होता.
अल्‍पवधीत त्‍यांनी विरोधी पक्ष नेत्‍यांना भूरळ पाडली. याच काळात त्‍यांचे काँग्रेसमधील महत्त्‍व वाढले. थेट काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदाची त्‍यांची वर्णी लागली.

आता पुढे काय?

आता हार्दिक पटेल हे ‘काँग्रेसमुक्‍त’ झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्‍ये प्रवेश करतील, अशी चर्चा गुजरातच्‍या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मागील दोन महिन्‍यांपासून हार्दिक हे गुजरात भाजप नेत्‍यांच्‍या संपर्कात आहेत. हार्दिक पटेल यांना भाजपमध्‍ये स्‍थान देण्‍यात यावे यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्‍व आग्रही असल्‍याची चर्चा आहे. तसेच आम आदमी पार्टी हाही त्‍यांच्‍यासमोर पर्याय आहे. आता हार्दिक कोणत्‍या पक्षात प्रवेश करणार, आगामी विधानसभा निवडणुकीत त्‍यांचे उपद्रव्‍य मूल्‍य किती राहणार, या प्रश्‍नांची उत्तरे काही दिवसांतच मिळणार आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button