जॉन्सन अँड जॉन्सन लसीला केंद्र सरकारने दिली परवानगी | पुढारी

जॉन्सन अँड जॉन्सन लसीला केंद्र सरकारने दिली परवानगी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन ही एक सिंगल डोस लस असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी शनिवारी सोशल मीडियाद्वारे सांगितले.

आपत्कालीन वापरास जॉन्सन अँड जॉन्सनच्‍या लसीला मंजुरी देण्यात आली असल्याचे मंडविया यांनी म्‍हटलं आहे.

केवळ एका डोसमध्येच कोरोनाविरुद्ध संरक्षण देणारी ही लस आहे. देशात वापरली जाणारी अशा प्रकारची पहिलीच लस आहे, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

देशात वॅक्सिन बास्केटचा विस्तार झाला असून आगामी काळात आणखीही काही लसी येण्याची शक्यता आहे.

देशात आतापर्यंत पाच लसींच्या वापरास परवानगी प्राप्त झालेली आहे.

लसीकरणाचा ५०कोटींचा टप्पा पार…..

दरम्यान देशाने लसीकरणाचा ५० कोटींचा टप्पा पार केला असल्याची माहिती नुकतीच आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी ४३ लाखांपेक्षा जास्त डोसेस देण्यात आले. त्यानंतर लसीकरणाचा ५० कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील १ कोटी लोकांना ज्या राज्यात लस देण्यात आली आहे, अशा राज्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

याच वयोगटातील १० लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आलेल्या राज्यांत आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगण, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि प. बंगाल यांचा समावेश आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दररोज ४० लाख डोसचे उत्‍पादन

देशात लसीकरणास प्रारंभ झाला तेव्‍हा दररोज लसीचे अडीच लाख डोसची निर्मिती होत होती. सध्‍या दररोज ४० लाख डोसचे उत्‍पादन होत आहे. लस उपलब्‍ध होण्‍याबरोबर लसीकरण मोहिम अधिक सक्षमपणे राबवता येणार आहे. सरकार लस
उत्‍पादनचा वेग कायम ठेवणार आहे, असेही आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

मुलांना लस उपलब्‍ध करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु

मुलांना लस उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी केंद्र सरकार सातत्‍याने प्रयत्‍न करीत आहे. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करुन याबाबत परीक्षणही सुरु आहे. लवकर मुलांसाठीही लस उपलब्‍ध होईल, असा विश्‍वासही डॉ. भारती पवार यांनी व्‍यक्‍त केला.

केवळ २० दिवसांमध्‍ये १० कोटी नागरिकांना लस

देशभरात ५० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील २० दिवसांमध्‍ये तब्‍बल १० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी

Back to top button