किरीट सोमय्या : ‘राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे कलम लावणाऱ्यांना तुरूंगात टाका’ | पुढारी

किरीट सोमय्या : 'राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे कलम लावणाऱ्यांना तुरूंगात टाका'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत आगपाखड केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर ज्यांनी ‘राजद्रोह’चे कलम लावण्याचा ‘द्रोह’ केला आहे. त्यांना तुरूंगात टाकण्याची मागणी सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली.

ठाकरे सरकारकडून राणा दाम्पत्याला देण्यात आलेली वागणूक तसेच हवाला एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी, उदय शंकर महावर यांच्या मनी लॉन्ड्रिंग कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. यासंबंधी ते वरिष्ठ भाजप नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

हनुमान चालीसा म्हटल्याने राजद्रोहाच्या आरोपाखाली ११ दिवस जेलमध्ये ठेवणाऱ्या माफिया सरकारची लाज वाटते. ही बेशरमीची हद्द झाल्याचे सोमय्या म्हणाले. राणा दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली आपबीती ऐकूण धक्का बसल्याचे तसेच इंग्रजांच्या काळाची आठवण झाल्याचे सोमय्या म्हणाले. राणा दाम्पत्यावर लावण्यात आलेले देशद्रोहाचे कलम चुकीचे असल्याचे मत सत्र न्यायालयाने नोंदवले. अशात २२ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारावर ज्यांनी हे देशद्रोहाचे कलम लावले. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

माफियागिरी करणाऱ्या गृहमंत्र्यांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित करीत गृहमंत्री माफिया प्रमाणे पोलिसांचा वापर करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. एकीकडे शरद पवार देशद्रोहासारखे कलम काढून टाकले पाहिजे, असे सांगत आहेत, तर त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री दलित महिला खासदारावर राजद्रोहाचे कलम लावतात. यावर पवारसाहेब माफी मागणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी आतापर्यंत १२ आरोप केले आहेत. परंतु, एकही कागद दिलेला नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला. यशवंत जाधव यांची ३८ बेनामी संपत्ती आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावी, अशी मागणी करीत त्यांच्याविरोधात दाखल १२ तक्रारीसंबंधी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांना जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होवू द्यायचा नसल्याने संजय राऊत मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button