कल्याण : अज्ञात प्रवाशाने चेन खेचल्याने लोको पायलटची जीव धोक्यात घालून कसरत | पुढारी

कल्याण : अज्ञात प्रवाशाने चेन खेचल्याने लोको पायलटची जीव धोक्यात घालून कसरत

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याणकडून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसची अज्ञात प्रवाशाने चेन खेचल्याने ही गाडी थांबवली आणि शहाड दरम्यान थांबली. मात्र, ज्या बोगीतील चेन खेचण्यात आली होती. ती बोगी नदीवरील पुलावर थांबल्याने ती चेन सुस्थितीत आणण्याचे आव्हान रेल्वेसमोर उभे ठाकले होते. अखेर गोदान एक्स्प्रेसचे लोको पायलट ए. आर. मिश्रा यांनी आपला जीव धोक्यात घालून गाडीखालील पुलाच्या रेलिंगवरून जात ब्रेकचा खटका वर केला. यानंतर गाडी मार्गस्थ झाली.

कल्याण कडून गोरखपूरकडे जणारी गोदान एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून मार्गस्थ झाली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही एक्स्प्रेस शहाड आणि आंबिवली दरम्यानच्या उल्हास नदीवर रेल्वेच्या पुलावरून जात असताना अज्ञात प्रवाशाने गाडीतील अत्यावश्यक चेन खेचली. यामुळे गाडीला इमर्जन्सी ब्रेक लागल्याने गाडी जागच्या जागी थाबली. मात्र, ज्या बोगीतील चैन खेचण्यात आली होती. ती बोगी नदीवरील पुलावर होती. रेल्वेचा नदीवरील पूल केवळ पटरी इतकाच असल्याने या पुलावर उभे राहणे अशक्य असल्याने गाडीखाली जाऊन ब्रेकचा खटका वर करायचे आव्हान होते.

अखेर गाडीचे लोको पायलट यांनी चालकाची परवानगी घेत गाडीला लटकून खाली जात त्यांनी खटका वर केल्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान, त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या एका साथीदाराने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मिश्रा यांच्या धाडसाचे कौतुक केले. कारणाशिवाय चेन खेचून प्रवाशांनी आपल्याबरोबर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशाचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button