पुढारी ऑनलाईन डेस्क : डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध काल (दि. 5) झालेल्या सामन्यात वादळी खेळी केली. दोघांनी आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी 122 धावांची भक्कम भागीदारी केली. यामुळे दिल्लीने मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली. वॉर्नर 92, तर पॉवेलने 35 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला. मात्र, वॉर्नर जेव्हा 90 धावांच्या च्या पुढे पोहोचला तेव्हा सर्व चाहत्यांना आशा होती की तो त्याच्या जुन्या फ्रँचायझीविरुद्ध शतक करेल पण तसे होऊ शकले नाही. वॉर्नरचे शतक पॉवेलमुळे हुकले अशा भावना अनेकांकडून व्यक्त होत आहेत. (IPL 2022)
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोव्हमन पॉवेल म्हणाला, "ओव्हरच्या सुरुवातीला मी वॉर्नरला सांगितले की तू शतक पूर्ण करू शकण्यासाठी मी धाव घ्यावी असे तुला वाटते का? तो म्हणाला, ऐक… क्रिकेट असं खेळलं जात नाही. तू शक्य तितके लांब शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजेस. आमच्या दोघांमधील संवादानंतर मी वॉर्नरने सांगितल्या प्रमाणेच केले.' (IPL 2022)
वॉर्नरची 92 धावांची खेळी आणखी खास होती कारण तो या सामन्यात त्याच्या माजी संघाविरुद्ध खेळत होता. गेल्या वर्षी हैदराबाद संघाच्या कर्णधारपदावरून वॉर्नरला हटवण्यात आले होते. तसेच त्यानंतर त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले.
पॉवेल मुलाखतीदरम्यान पुढे म्हणाला की, मी आमचा दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत एक विनंती केली. त्याला मी 5 व्या क्रमांकावर फलंदाजीस जातो असे म्हटले. ऋषभला हेही पटवून दिले माझ्याकडे आता फिरकीचा सामना करण्याची क्षमता वाढली आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव.' (IPL 2022)