पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोलकाता दौऱ्याच्या काही तासांपूर्वी काशीपूरमधील भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. मृत अर्जुन चौरसिया या भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. या घटनेनंतर प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी उडताना दिसत आहेत.
उ. कोलकाता येथील भाजप कार्यकर्ता अर्जुन चौरसिया याचा मृतदेह त्यांच्या घराजवळील निर्जन इमारतीत लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेने कोलकातील राजकीय वातावरण तापले आहे. अमित शहा यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज मृत अर्जुन एका बाईक रॅलीचे नेतृत्व करणार होते. त्यांची हत्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला असून, तृणमूल काँग्रेसने याचा ठामपणे विरोध केला आहे.
भाजप कार्यकर्त्याच्या या दुर्दैवी हत्येमुळे कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
भाजपच्या बंगाल युनिटने ट्विटमध्ये म्हटले आहे, "२७ वर्षीय BJP उपाध्यक्ष अर्जुन चौरसिया यांची उत्तर कोलकाता येथे निर्घृणपणे हत्या करून त्यांना गळफास देण्यात आला. विरोधी राजकीय कार्यकर्त्यांनी केलेल्या हत्येने पश्चिम बंगालमधील लोकशाहीचे पतन झाले आहे. आजपर्यंत गेल्या एका वर्षात भाजपचे ५७ कार्यकर्ते मारले गेले आहेत. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मानवतेचा गळा दाबला आहे.