भाजपाच्या खासदाराची राज ठाकरेंना धमकी; शिव-शाहूंचा दाखला देत म्हणाले, "मराठ्यांनी..." | पुढारी

भाजपाच्या खासदाराची राज ठाकरेंना धमकी; शिव-शाहूंचा दाखला देत म्हणाले, "मराठ्यांनी..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : “ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासारखे लोक जन्माला आले, त्याच महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि त्यांना मारहाण करणारा राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्माला आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्याआधी माफी मागितली नाही तर उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही”, असे धमकी भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना दिली आहे.

ब्रिजभूषण सिंह हे एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज ज्या महाराष्ट्रात जन्मले त्या महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. मराठ्यांनी तर देशासाठी पानिपतपर्यंत येऊन युद्ध केले आहे. हा महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास आहे. शिवरायांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे, त्यांच्या विश्वासाचे लोक होते. पण त्याच महाराष्ट्रात राज ठाकरेसारखी व्यक्ती जन्मते आणि मराठी माणूस आणि उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करते.”

“महाराष्ट्रात राज ठाकरे अजानाचा विरोध करो किंवा हनुमान चालिसाचं पठण करो, मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. कारण, मी उत्तर भारतीय आहे. आणि राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. भगवान राम यांना लहान करू नये, पण तेदेखील उत्तर भारतीयच होते. त्यांच्या वशंजांना मागील २० वर्षांपासून या व्यक्तीने सतत अपमानीत केलं आणि मारहाण केली, त्यासाठी राज ठाकरेंनी माफी मागावी. तर अयोध्येत राज ठाकरेंना येण्याला माझा आक्षेप नाही”, असे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले.

“इतकंच नाही तर राज ठाकरेंनी अयोध्येत यावं, पण त्यांनी जे चुकीचं काम केलं, जे विष कालवून फूट पाडण्याचं काम केलं त्यासाठी माफी मागावी. कारण, त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. माझ्याकडे त्यांची नावं आहेत. गरज भासली तर ती यादीदेखील देईल. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, खेद व्यक्त करावा. केवळ राजकारणासाठी माफी न मागता अयोध्येला येऊन दर्शन घेऊन, फोटो काढून जाणार असाल, तर मी मात्र राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही”, अशी धमकी ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिली आहे.

पहा व्हिडीओ : …आणि त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला!

Back to top button