भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरून प्रचंड राडेबाजी; पंजाब पोलिसांवर दिल्लीत गुन्हा दाखल | पुढारी

भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरून प्रचंड राडेबाजी; पंजाब पोलिसांवर दिल्लीत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांकडून झालेल्या अटकेनंतर प्रचंड राडेबाजी झाली असून, बग्गा यांना पंजाबमध्ये नेले असताना हरियाणा पोलिसांनी आपल्या हद्दीत रोखले आहे. तिकडे दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांवर बग्गा यांचे अपहरण केले असल्याचे सांगत गुन्हा दाखल केला आहे. जनकपुरी येथून बग्गा यांचे अपहरण करण्यात आले असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे ठार मारण्याची धमकी बग्गा यांनी दिली असल्याचे सांगत पंजाबमधील सनी सिंग नावाच्या कार्यकर्त्याने पंजाब पोलिसांच्या सायबर शाखेत गुन्हा नोंदविला होता. याच मुद्द्यावरून पंजाब पोलिस बग्गा यांना अटक करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीला फेऱ्या मारत होते. मात्र बग्गा त्यांना चकमा देत होते. अखेर पंजाब पोलिसांनी बग्गा यांना शुक्रवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. बग्गा यांना त्यानंतर मोहाली येथे नेले जात असताना हरियाणा पोलिसांनी ताफ्याला कुरुक्षेत्र येथे अडविले. मोहाली येथील न्यायालयात एक वाजता होणाऱ्या सुनावणीसाठी बग्गा यांना नेले जात असल्याचे पंजाब पोलिसांकडून यावेळी सांगितले जात होते.

तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्याविरोधात पंजाब पोलिसांत भारतीय दंड संहितेच्या कलम 153-ए, कलम 505 तसेच कलम 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बग्गा यांच्या अटकेवरून भाजप आक्रमक झाली असून ही अटक बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. बग्गा यांच्या अटकेविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जनकपुरी पोलिस ठाण्यासमोर निदर्शनेही केली. मुख्यमंत्री केजरीवाल तसेच पंजाब पोलिसांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी आधी दोन पोलिस आले, त्यानंतर 10 ते 15 पोलिसवाले आले. त्यांनी मला बुक्की मारली व तेजिंदर यांना घेऊन गेले, असा आरोप बग्गा यांच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना केला. बग्गा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आपत्तीजनक शब्दांचा वापर केला असून, जाती आणि धर्माच्या आधारावर समाजात ते फूट पाडत असल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button