कोल्‍हापूर : शिरटीतील कष्टकऱ्यांची शाहू महाराजांप्रती कृतज्ञता; थेट शेताच्या बांधावरून अभिवादन | पुढारी

कोल्‍हापूर : शिरटीतील कष्टकऱ्यांची शाहू महाराजांप्रती कृतज्ञता; थेट शेताच्या बांधावरून अभिवादन

शिरटी; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात शाहूंच्या विचारांचा जागर सुरू आहे. आज (शुक्रवार) दि. ६ मे रोजी स्मृती शताब्दीदिनी सकाळी १० वाजता शिरटी, अर्जुनवाड, हसुर, कनवाड, कुटवाड, घालवाड परिसरात विविध ठिकाणी नागरिकांकडून १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेतकरी, शेतमजूरांनी शेतीची कामे सुरू असताना थेट शेताच्या बांधावरून शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.

गेल्या दोन दिवसांपासून शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित १०० सेकंद स्तब्धता पाळण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले होते. यास नागरिकांनी आज उस्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय, शाळा, तसेच विविध कार्यालयात शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले.

सकाळी १० वाजता जो जिथे असेल तिथे जागच्या जागी १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

Back to top button