मशिदींवर अजानसाठी भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय | पुढारी

मशिदींवर अजानसाठी भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मुद्दयावरून रान पेटवले असताना मशिदींवर अजानसाठी भोंग्यांचा वापर करणे हा मूलभूत अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर भोंगे वापरण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. बदाऊनच्या बिसौली तहसीलमधील बहवानपूर गावातील नूरी मशिदीच्या मुतवल्ली इरफानच्या वतीने ही याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती विवेक कुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती विकास यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेच्या माध्यमातून मुलभूत अधिकारांतर्गत भोंगे लावण्यास परवानगी देण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. परंतु अजानसाठी भोंगे वापरण्याची परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मशिदींमध्ये अजानसाठी भोंगे लावणे मूलभूत अधिकारांतर्गत येत नाही. असे न्यायालयाने सांगून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी चुकीची ठरवून अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान, शिवाजी पार्क आणि ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मेची डेडलाईन दिली होती. भोंगे न उतरविल्यास मनसैनिक अजानचा आवाज येत असलेल्या मशिदींसमोर किंवा पसिरातील मंदिरावर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावतील, असा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्रातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरत नाहीत, तोपर्यंत मनसेचे हनुमान चालिसा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. भोंग्यांचा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय आहे. मशिदींना वर्षभरासाठी परवानगी कशी मिळते, असा सवाल करत आमच्या सणांना १० दिवसांसाठी परवानगी मिळते. असेही ते म्हणाले होते. अनधिकृत मशिदीवर भोंगे लावण्याची परवानगी मिळाल्यास हनुमान चालिसा लावणार. कुणीही धार्मिक रंग दिला तर आम्हीही त्‍याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button