Sanjay Raut : आताच्या केंद्र सरकारपेक्षा इंग्रज सरकार बरे; संजय राऊत यांचा हल्लाबोल | पुढारी

Sanjay Raut : आताच्या केंद्र सरकारपेक्षा इंग्रज सरकार बरे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात अनेक दिलासा घोटाळे सुरू आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे. आताच्या केंद्र सरकारचा कारभार जर पाहिला तर इंग्रज सरकार बरे होते, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राणा दाम्पत्याला इंग्रज सरकारप्रमाणे वागणूक मिळाली, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली होती. पुणे येथे पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. (Sanjay Raut)

राणा दाम्पत्यांवरील राजद्रोहातील गुन्ह्याबाबत बोलत असताना ते म्हणाले की, गुन्हे आमच्यावरच सिद्ध होतात, इतरांवर का नाही असा सवाल देखील त्यांनी केला.

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे सभा घेतली. शिवसेनादेखील औरंगाबाद येथे सभा घेणार आहे. यावर बोलत असताना ते म्हणाले की, राज ठाकरेंनी सभा घेतली म्हणून शिवसेना सभा घेत नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मराठवाड्यात सभा घेतलेल्या आहेत. शिवसेनेच्या सभा ह्या गर्दीने ओसंडून वाहतात. याबाबत इतिहास जर पाहिला असेल तर, गेली ५५ वर्षे शिवसेनेने जिथे जिथे सभा घेतल्या तिथे इतिहास निर्माण झाला आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राऊत यांच्या आमचं बहुजनाचे सरकार असल्याच्या वक्तव्यावर टीका केली. यावर ते म्हणाले की, ज्यांचं समाजकारणातलं, राजकारणातलं कार्य कितपत आहे याचा विचार करावा. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत हे पहावं. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये असा टोला त्यांनी पडळकर यांना लगावला.

जितेंद्र नवलानींवर केलेल्या कारवाईवर बोलत असताना, पोलिसांना आपले काम करू द्या. जे सत्य असेल ते योग्य वेळी बाहेर पडेल असं मत त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा

Back to top button