

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ३ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,१५७ नवे रुग्ण आढळून आले. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १९,५०० वर पोहोचली आहे. दिवसभरात २,७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आतापर्यंत लसीचे १८९ कोटी २३ लाख, ९८ हजार ३४७ डोस देण्यात आले आहेत.
देशात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूसंख्या कमी आहे. देशात २५ एप्रिल ते १ दरम्यान २२,२०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीच्या आठवड्यात १५,८०० रुग्णांची नोंद झाली होती. याचाच अर्थ गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येत दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्येचे प्रमाण ६८ टक्के आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यात ९,६८४ रुग्णांची नोंद झाली होती. याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत दिल्लीतील रुग्णसंख्येचे प्रमाण ५३ टक्क्यांनी अधिक आहे. याआधीच्या आठवड्यात दिल्लीत ६,३२६ रुग्णांची नोंद झाली होती. केरळमध्ये गेल्या आठवड्यात २ हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीचा दर स्थिर आहे. पण कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल, तेलंगणा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून बूस्टर डोस साठी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कुठलाही बदल करणात आलेला नाही. बूस्टर डोस साठी नऊ महिन्यांचीच मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. गेल्या आठवड्याच्या सुरूवातीलाच दुसऱ्या आणि बूस्टर डोस दरम्यानचे अंतर कमी करून सहा महिन्यांवर आणण्याची शक्यता वर्तवली जात होती. पंरतु,सरकारचा त्यात कुठलाही बदल करण्याचा विचार नसल्याची माहिती समोर आली आहे.
आयसीएमआर तसेच इतर आंतरराष्ट्रीय शोध संस्थांच्या रिसर्चनूसार लसीच्या दोन डोसच्या प्राथमिक लसीकरणानंतर जवळपास सहा महिन्यांनी शरीरात अँटीबॉडीचा स्तर कमी होतो. बूस्टर डोस दिल्याने कोरोना संसर्गाविरोधात रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. अशात दुसऱ्या आणि बूस्टर डोस दरम्यानचे अंतर नऊ वरून सहा महिन्यांवर आणण्याची शिफारस राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाकडून (एनटीएजीआय) केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
नऊ महिन्यांपूर्वी दुसरा डोस ज्यांनी घेतला आहे अशा १८ वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिक खबरदारी म्हणून बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. देशात १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनाविरोधातील युद्धात आघाडीवर असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सला बूस्टर डोस लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तदनंतर मार्च महिन्यापासून ६० वर्षांहून अधिक वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस घेण्यात पात्र ठरवण्यात आले.