सातारा : जिल्ह्यातून कोरोना हद्दपार | पुढारी

सातारा : जिल्ह्यातून कोरोना हद्दपार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे दिल्लीमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून त्याठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. असे असताना सातारा जिल्ह्यात मात्र कोरोना संपला असल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना हद्दपार झाला आहे. आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासीयांना आता दिलासा मिळाला आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

कोरोनाच्या आतापर्यंत झालेल्या तीन लाटांमध्ये दोन लाख 80 हजारांच्या घरात बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात दि. 23 मार्च 2020 रोजी दुबईवरून आलेली खंडाळ्याची महिला पहिली बाधित आढळली. दि. 28 रोजी कॅलिफोर्निया येथून आलेल्या खेडच्या वृद्धाचा मृत्यू झाला आणि तो कोरोनाचा पहिला बळी ठरला होता. तेव्हापासून बाधितांचा वाढणारा आकडा आता पूर्णपणे थांबला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 39 हजार बाधित आढळले तर 900 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मधील फेब्रुवारीपासून दुसरी लाट सुरू झाली. यामध्ये जवळपास दोन लाख रुग्णांची नोंद झाली. तर साडे चार हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यातच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळले. यात 5 रुग्णांना आपली द़ृष्टी गमवावी लागली. जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली. मात्र, प्रशासन सतर्क झाल्याने व लाट कमी असल्याने जानेवारी महिन्यात 23 हजार 324 जणांना कोरोनाची लागण झाली. यामधील 91 जणांचा कोरोनाने बळी गेला. फेब्रुवारीमध्ये 3 हजारांहून अधिक बाधित तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. बाधित आकडा शून्याच्या घरात आला. जिल्ह्यातून कोरोना संपला आहे. तर दोन वर्षांनंतर होत असलेला जत्रा-यात्रांचा हंगाम जोरदार होताना दिसत आहे.

तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी…

कोरोनामुळे जग होरपळत असताना सातारा जिल्ह्यातीलही परिस्थिती काही वेगळी नव्हती. परंतु, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या योग्य नियोजनामुळे बाधितांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली. आता तर कोरोना जिल्ह्यातून संपलाच आहे. दोन लाटेच्या तुलनेत तिसर्‍या लाटेची तीव्रता तर अत्यंत कमी राहिली. आता कोरोना शिल्लकच राहिलेला नाही.

Back to top button