COVID-19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ! २४ तासांत ३,३०३ नवे रुग्ण, ३९ जणांचा मृत्यू | पुढारी

COVID-19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ! २४ तासांत ३,३०३ नवे रुग्ण, ३९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांची (COVID-19) संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,३०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,५६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १६,९८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

याआधी मंगळवारी दिवसभरात २ हजार ९२७ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर, ३२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान २ हजार २५२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५८ टक्के नोंदवण्यात आला होता.

गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. १९ एप्रिलला २,०६७, २० एप्रिल २,३८०, २१ एप्रिल २,४५१, २२ एप्रिल २,५२७, २३ एप्रिल २,५९३, २४ एप्रिल २,५४१ आणि २५ एप्रिलला देशात २ हजार ४८३ कोरोनाबाधित आढळून आले होते.

देशात कोरोनाविरोधात (COVID-19) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८८ कोटी ४० लाख ७५ हजार ४५३ डोस देण्यात आले आहेत. यातील २.७५ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, २ कोटी ७२ लाख ४६ हजार ८८३ बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी ८८ लाख ४४ हजार ५३५ डोस पैकी १९ कोटी ७० लाख ९८ हजार ५८५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ५९ लाख ७४ हजार ७९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहे. मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५ हजार ६५ कोरोना तपासण्या करण्यात आलयाची माहिती आयीएमआरकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही : पंतप्रधान

देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोनास्थितीसंबंधी चर्चा केली. गेल्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनासंबंधी केलेल्या एकत्रित कामगिरीबद्दल बैठकीतून पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणाले, कोरोनासंबंधी ही २४ वी बैठक आहे. कोरोनाकाळात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित केलेल्या कार्याने कोरोनाविरोधातील युद्धात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. कोरोनाचे आव्हान अद्यापही संपुष्टात आलेले नाही आणि धोकाही टळलेला नाही. ओमायक्रॉन तसेच त्याचे सबव्हेरियंट गंभीर स्थिती निर्माण करू शकतात, हे यूरोप देशातील स्थितीवरून दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

भारताचे वैज्ञानिक आणि विशेतज्ञ जागतिक स्थितीसह देशातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अशात त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सामूहिक दृष्टिकोणातून पालन आवश्यक आहे. अगोदरपासून आतापर्यंत संसर्गाला सुरूवातीच्या काळात रोखण्याला प्राथमिकता देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अनेक दिवसांनी शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालकांच्या मनातील चिंता वाढली आहे. लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त अनेक ठिकाणांवरून समोर येत आहेत. पंरतु, बालकांना कोरोना लसीचे सुरक्षाकवच मिळत असल्याची बाब समाधानकारक आहे.उद्या पासून ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाचे शाळांमध्ये यासंबंधी विशेष अभियान राबवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला

देशातील बूस्टर डोसची स्थिती

श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४७,३६,५६७
२) फ्रंटलाईन वर्कर्स ७४,४७,१८४
३) १८ ते ४४ वयोगट १,१३,३३४
४) ४५ ते ४९ वयोगट ४,०४,२१३
५) ६० वर्षांहून अधिक १,४५,४५,५९५

हे ही वाचा :

Back to top button