राज्यात लसीकरणाची सक्‍ती करण्याचा विचार | पुढारी

राज्यात लसीकरणाची सक्‍ती करण्याचा विचार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, त्यासाठी स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. राज्यात लसीकरण सक्‍तीचे करण्याचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली जाईल, असे ते म्हणाले.

फ्लूसद‍ृश लक्षणे आढळल्यास तत्काळ आरटी-पीसीआर चाचणी करा, चाचण्यांची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी पावसाळापूर्व कामेही वेगाने करण्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिकार्‍यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, टास्क फोर्स सदस्य उपस्थित होते.

कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन व्हेरियंट जन्माला येत आहेत. कोरोनाच्या तीन लाटेचा यशस्वीपणे मुकाबला केला असला, तरी आपल्या काही आप्‍तस्वकीयांना गमावले आहे, यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कोरोना अनुकूल वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे. केंद्राकडे लसीकरण सक्‍तीचे करण्याबाबत तसेच दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस देताना कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांना शासकीय रुग्णालयांतून बूस्टर डोस देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाचा वेग वाढवा : टोपे

जिल्हाधिकार्‍यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. जनजागृती मोहीम पुन्हा एकदा नव्याने राबवा. आरोग्य संस्थांमधील सर्व सयंत्रांची देखभाल-दुरुस्ती करताना फायर ऑडिटचे कामही पूर्णत्वाला न्या, असेही त्यांनी सांगितले. मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी टंचाई असलेल्या जिल्ह्यांत टंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा, पावसाळापूर्व कामे योग्य पद्धतीने व वेळेत पूर्ण करा, आरोग्य संस्थांच्या बांधकामाधीन असलेल्या इमारतींचे बांधकाम पूर्णत्वाला न्या आदी सूचना केल्या.

हेही वाचलत का?

Back to top button