राहुल गांधींविरोधातील भूमिकेमुळे प्रशांत किशोरांचा काँग्रेस प्रवेश थांबला | पुढारी

राहुल गांधींविरोधातील भूमिकेमुळे प्रशांत किशोरांचा काँग्रेस प्रवेश थांबला

नवी दिल्ली,  पुढारी वृत्तसेवा : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या गेले अनेक दिवस चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या आशा मावळल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातील वक्तव्यांमुळे प्रशांत किशोरांना प्रवेश नाकारला असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

प्रशांत किशोरांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भविष्याबद्दल प्रशांत किशोर यांनी अनेक वक्तव्ये केली होती. राहुल गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व चांगले असल्याचे प्रशांत किशोर यांनी अनेक वेळा म्हटले होते. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांचे इतर पक्षाशी असणारे संबंध आणि राहुल गांधींवर केलेल्या टीका यांमुळे त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही.

प्रशांत किशोरांच्या कामकाजावर सल्ले देणाऱ्या समितीने आपल्या अहवालात प्रशांत किशोर यांनी केलेल्या अनेक ट्विटचाही उल्लेख केला आहे. हे ट्विट त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात केले होते. शिवाय प्रशांत किशोर यांच्यामुळे इतर पक्षांनाच फायदा होईल, असेही या समितीने म्हटले आहे. राहुल गांधींवर टीका करताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, राहुल गांधी नरेंद्र मोदींची ताकद समजणार नाहीत, तोवर त्यांचा निवडणूकीत पराभव करू शकणार नाहीत.

निवडणूक सल्लागार कंपनीची जबाबदारी सोडावी

प्रशांत किशोर यांना पक्षात येण्यासाठी सल्लागार कंपनीची जबाबदारी सोडावी लागेल, असेही काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. काँग्रेस पक्षासोबत रविवारी चर्चा थांबल्यानंतर प्रशांत किशोर यांनी तेलंगणातील सत्ताधारी पक्ष टीआरएस सोबत निवडणूक रणनितीचे संचालन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Back to top button