

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मागण्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मंगळवारी देखील संसदेत गदारोळ घातला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदेत गदारोळ घातल्याने उभय सदनांचे दिवसभराचे कामकाज वाया गेले. यामुळे अनेक महत्त्वाची विधेयके प्रलंबित पडली आहेत. तर विविध विषयांवरील चर्चा रखडली आहे.
लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजास सुरुवात झाल्या झाल्या विरोधी सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
प्रश्नोत्तराच्या तासात शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यास मुभा दिली जाईल, असे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना सांगितले.
विरोधक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला चर्चाच नको आहे, असे बिर्ला यांनी विरोधकांना सुनावले.
अखेर गदारोळात कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत व त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
राज्यसभेतही प्रश्नोत्तर व शून्य प्रहरातले कामकाज गोंधळामुळे पूर्णतः वाया गेले.लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात रक्षा खडसे यांनी महाराष्ट्रातील पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता.राज्यात गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
प्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी योजनेअंतर्गत राज्यांकडून येणारा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.हा निधी प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून शेतकऱ्यांना पैसे जारी केले जातील, असे स्पष्ट केले.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघात गतवर्षी सोयाबीन, मूग तसेच इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीची अजून भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. क्लेमचे पैसे देण्यास उशीर होत असेल तर त्यावर बँकांना व्याज द्यावे लागेल, असे कैलाश चौधरी यांनी उत्तरात नमूद केले.
हेही वाचलं का?