
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पंचायतींना जम्मू येथून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 संपुष्टात आणले होते. त्यानंतरचा पंतप्रधानांचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा राहणार आहे. जम्मूमधील सांबा जिल्ह्यातील पाल्ली गावातून जम्मू काश्मीरसाठीच्या 38 हजार 82 कोटी रुपयांच्या कामांची सुरुवातही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
संयुक्त अरब आमिरातीने जम्मू काश्मीरमध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविलेली आहे. या पार्श्वभूमीवर पाल्ली गावात होणार्या कार्यक्रमास त्या देशाचे काही प्रतिनिधी हजर राहणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. गेल्या मार्च महिन्यात युएईच्या 34 सदस्यीय पथकाने जम्मू काश्मीरचा दौरा केला होता.
विशेषतः पर्यटन आणि हॉटेल उद्योगात गुंतवणूक करण्यात युएईने स्वारस्य दाखविलेले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते काही जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गजेंद्रसिंग शेखावत हेही मोदी यांच्यासोबत दौर्यावर राहणार आहेत. एकवीसशे कोटी रुपये खर्चुन बांधल्या जात असलेल्या बनिहाल-काझीगुंड रस्त्यावरील बोगद्याच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगरदरम्यानचे अंतर 16 किलोमीटरने कमी होणार आहे. याशिवाय प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.