मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करा अन् सुरक्षा मिळवा; नीलम गोर्‍हेंचा खोचक टोला | पुढारी

मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करा अन् सुरक्षा मिळवा; नीलम गोर्‍हेंचा खोचक टोला

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : ज्यांना केंद्र सरकारचे संरक्षण हवे आहे असे लोक हल्‍ली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत आहेत. केंद्र सरकारही जणू एखादी योजना असावी या पध्दतीने अशी टीका करणाऱ्यांना संरक्षण देत आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी टीका केली.

तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी उपसभापती गोर्‍हे गुरुवारी (दि. २१) तुळजापुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना अनेक बाबींवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे देशात चांगले काम करीत आहेत. त्यामुळेच त्यांना विविध सर्वेक्षणात मोठी पसंती मिळत आहे. हल्‍ली ज्यांना पोलिस संरक्षण हवे आहे असे लोक मुख्यमंत्री ठाकरे तसेच आघाडी सरकारवर टीका करीत आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार नवनीत राणा, आ. रवी राणा, कंगना रणौत यांना वाय दर्जाची सुरक्षा अशा टिका केल्यानेच मिळाली आहे.

कोणत्याही मुद्यांवरुन सध्या समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री वळसे पाटील नक्‍कीच मार्ग शोधून काढतील, असे सांगून उपसभापती गोर्‍हे यांनी प्रलंबित १२ विधान परिषद आमदारांबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, की राज्यपाल हे विधीमंडळाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्याविषयी आम्ही बोलणे योग्य नाही. पण राज्यपाल नियुक्‍त आमदार हे समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधी असतात. महाराष्ट्र राज्य हे त्यांचे कार्यक्षेत्र असते. राज्याला दिशा देण्यासाठी अनेक बैठका विधीमंडळ सदस्यांच्या होत असतात. या बैठकांत या आमदारांचे प्रतिनिधीत्व महत्वपूर्ण असते. अर्थात राज्य सरकार याचा पाठपुरावा करीत आहेच. लवकरच या नियुक्त्या होतील, अशी आशा आहे.

दोन जिल्ह्यांचे नामांतर

उस्मानाबाद, औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. हैदराबादचे भाग्यनगर होते. मात्र महाराष्ट्रात अजूनही धाराशिवला थारा नाही. हे केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण आहे. दिल्‍लीतील अनेक रस्त्यांची नावे केंद्राने बदलली पण ठराव करुनही महाराष्ट्रातील प्रस्ताव मात्र दुर्लक्षित केले आहेत.
– नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

हे ही वाचलं का ?

Back to top button