

Harshvardhan Jain fraud
नवी दिल्ली : खोट्या राजदूताच्या साजेशीर वेषात जगभर फिरत, परदेशी गुंतवणूक, नोकऱ्या व बिझनेस डीलचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या हर्षवर्धन जैन या व्यक्तीचा गूढ आणि गूढपणाने भरलेला आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.
उत्तर प्रदेशच्या विशेष दलाने (STF) हर्षवर्धन जैन याला अटक केली असून, सध्या त्याच्या घोटाळ्याच्या चौकशीचा व्याप वाढताना दिसून येत आहे.
हर्षवर्धन जैन (वय 47) याने 2005 ते 2015 या कालावधीत तब्बल 162 वेळा परदेशात प्रवास केला. त्यात युएईमध्ये 54 वेळा आणि यूकेमध्ये 22 वेळा प्रवास केला गेला. या प्रवासांच्या आडून त्याने अनेक बोगस व्यवहार आणि आर्थिक फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे.
जैनने स्वतःला वेस्टार्कटिका, सेबोर्गा, लॅडोनिया आणि पॉल्व्हिया या अज्ञात मायक्रोनेशन्सचा राजदूत घोषित करून, गाझियाबादमधील एका आलिशान बंगल्या मधून "खोटं दूतावास" चालवलं होतं.
या बंगल्यावर परदेशी राष्ट्रांचे झेंडे, राजदूत म्हणून वापरण्यात येणाऱ्या नंबर प्लेट्स असलेली लक्झरी गाड्या आणि विविध पदव्या लावून तो लोकांना फसवत होता. त्याने “बारन ऑफ वेस्टार्कटिका” अशीही पदवी वापरली होती.
जैनशी संबंधित 25 शेल कंपन्या युके, युएई, मॉरिशस आणि कॅमेरूनमध्ये नोंदवण्यात आल्या होत्या, असे चौकशीत समोर आले आहे.
यामध्ये ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन लि.’, ‘ईस्ट इंडिया कंपनी यूके लि.’, ‘आयलंड जनरल ट्रेडिंग को. LLC (UAE)’, आणि ‘इंदिरा ओव्हरसीज लि. (मॉरिशस)’ यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे त्याच्या नावे परदेशात 10 बँक खाती असल्याचं निष्पन्न झालं आहे यातील 6 युएईमध्ये, 3 यूकेमध्ये आणि 1 मॉरिशसमध्ये आहेत.
त्याच्या बंगल्यावर छापा टाकल्यानंतर, पोलिसांना सेबोर्गा, लॅडोनिया आणि इतर मायक्रोनेशन्सच्या नावाने तयार केलेले 12 बनावट राजनैतिक पासपोर्ट मिळाले.
त्याने अनेक भारतीय आणि परदेशी कंपन्यांना मोठ्या कर्जाचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून पैसे उकळले आणि त्यातून 300 कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय आर्थिक घोटाळा केला, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.
जैनच्या या आर्थिक कारस्थानामध्ये हैदराबादचा असलेला आणि तुर्कीचे नागरिकत्व स्विकारलेला अहसान अली सय्यद हा मुख्य सहकारी होता. या दोघांनी मिळून परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीचं आमिष दाखवून, त्यांच्याकडून पैसे उकळले. स्वित्झर्लंडमधील आर्थिक अडचणीत असलेल्या कंपन्यांना टार्गेट करून, त्यांच्याकडून पैसे घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जैनचा संबंध कुप्रसिद्ध सौदी शस्त्रास्त्र व्यापारी अदनान खशोग्गी याच्याशीही होता. 2002 ते 2004 या दरम्यान खशोग्गी याने थेट जैनच्या खात्यात 20 कोटी रुपये जमा केले होते, त्याचा वापर नेमका कुठे झाला याची चौकशी केली जात आहे.
एसटीएफने जैनच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला असून, सोमवारी सुनावणी होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जैनचे हे बनावट राजनैतिक जाळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेलं असून, आणखी अनेक फसवणुकीची प्रकरणं या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.