

PM Modi Tamil Nadu visit
गंगैकोंड चोलपूरम् (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तमिळनाडूतील ऐतिहासिक गंगैकोंड चोलपूरम् मंदिरात थेट उपस्थित राहून समारंभात भाग घेतला. राजेंद्र चोल पहिल्याच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींनी चोल साम्राज्याच्या लोकशाही मूल्यांची प्रशंसा केली आणि 'कुडवोलाई प्रणाली'चा विशेष उल्लेख करत भारताने लोकशाही परंपरा किती प्राचीन काळापासून जोपासल्या आहेत, हे अधोरेखित केले.
“ब्रिटनचा मॅग्ना कार्टा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. पण त्याच्या कित्येक शतकांपूर्वी भारतातील चोल साम्राज्यात कुडवोलाईसारख्या निवडणूक पद्धती होत्या, हे आपल्याला इतिहास सांगतो,” असे मोदी म्हणाले. त्यांनी राजेंद्र चोल यांचं कौतुक करत सांगितलं की, "कितीतरी राजा दुसऱ्या देशांवर विजय मिळवून सोने, चांदी आणत. पण राजेंद्र चोल मात्र गंगाजल घेऊन आले."
चोल साम्राज्याच्या काळात (10 व्या ते 12 व्या शतकात), ग्राम पातळीवर लोकप्रतिनिधींची निवड कुडवोलाई पद्धतीने केली जात होती. या पद्धतीत पात्र उमेदवारांची नावे चिठ्ठ्यांवर लिहून मातीच्या कुंडीत टाकली जात.
मग एक लहान मूल किंवा अंध व्यक्ती त्या कुंडीतून एक चिठ्ठी काढत आणि त्यावरचं नाव विजयी उमेदवार म्हणून घोषित केलं जाई. ही एक पारदर्शक आणि प्रभावी निवडणूक प्रक्रिया मानली जाते.
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी पारंपरिक तमिळ पोशाख – पांढरा वेष्टी (धोतर), पांढरा शर्ट आणि अँगवस्त्रम – परिधान करून उपस्थित राहिले. मंदिराच्या प्राचीन परिसरात त्यांनी भगवान बृहदेश्वराचे दर्शन घेतले आणि देशातील १४० कोटी नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
मोदींनी आपल्या भाषणात शैव परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. “आज जग हिंसा, अस्थिरता आणि पर्यावरणीय संकटांना सामोरे जात आहे. अशा वेळी शैव तत्वज्ञान आपल्याला उपाय दाखवतं. ‘प्रेम म्हणजेच शिव’ ही संकल्पना जगाने स्वीकारली तर बरीच संकटं आपोआप सुटू शकतात,” असं ते म्हणाले. चंद्रयान-३ च्या लँडिंग साइटचं नाव ‘शिवशक्ती पॉइंट’ ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधानांनी काशी आणि चोल परंपरेतील सांस्कृतिक संबंधांवर भाष्य करत सांगितलं की, “मी काशीचा लोकप्रतिनिधी आहे. आज पुन्हा एकदा काशीहून गंगाजल येथे आणण्यात आलं आहे. चोल राजांच्या या कार्यामुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या संकल्पनेला नवी ऊर्जा मिळते.”
चोल साम्राज्याचं व्यापारी आणि मुत्सद्दी संबंध श्रीलंका, मालदीव, आग्नेय आशिया यांसारख्या देशांपर्यंत होते, हे मोदींनी अधोरेखित केलं. “काल मी मालदीवहून परत आलो आणि आज या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, ही एक सुंदर संयोगाची गोष्ट आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
या सोहळ्यात संगीतातील दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांनी विशेष भक्तिसंगीत सादर केलं. मोदींनी त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं, “ही राजा चोलांची भूमी आहे आणि इलैयाराजा यांनी शिवभक्तीत सर्वांना रंगवलं. मी काशीचा खासदार आहे.
आणि ‘ओम नम: शिवाय’ ऐकताच अंगावर काटा येतो. शिवाचे दर्शन, इलैयाराजांचा संगीत अनुभव आणि मंत्रांचा घोष – हे सगळं मिळून आत्म्याला अंतर्बोध देणारं एक अध्यात्मिक अनुभव आहे.”
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींचा तिरुचिरापल्ली जिल्ह्यात जोरदार रोड शोही झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या स्थानिकांनी उत्साहात स्वागत केलं. गंगैकोंड चोलपूरम् मंदिर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. बृहदेश्वर मंदिरातील कलात्मक मूर्ती, चोलकालीन कांस्य मूर्ती, शिलालेख या मंदिराचे वैशिष्ट्य आहेत.