

Indian Army Rudra Brigades
द्रास (कारगिल) : 26 व्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
भारतीय लष्कराला भविष्यासाठी सज्ज आणि अधिक घातक बनवण्यासाठी 'रुद्र' नावाच्या नव्या 'ऑल-आर्म्स ब्रिगेड'ची (सर्व-शस्त्र ब्रिगेड) स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
याचवेळी त्यांनी सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सज्जड इशाराही दिला.
लष्कराला भविष्याभिमुख आणि अधिक प्रभावी बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून 'रुद्र' ब्रिगेडची निर्मिती केली जात आहे. लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, "आजचे भारतीय लष्कर केवळ सध्याच्या आव्हानांना तोंड देत नाही, तर वेगाने स्वतःला आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज दलामध्ये रूपांतरित करत आहे.
याचाच एक भाग म्हणून 'रुद्र' या नव्या ऑल-आर्म्स ब्रिगेडची स्थापना केली जात आहे, ज्याला मी कालच मंजुरी दिली आहे."
'रुद्र' ब्रिगेडची रचना पारंपरिक ब्रिगेडपेक्षा वेगळी असेल. आतापर्यंत लष्करात विशिष्ट दलांच्या (उदा. फक्त पायदळ किंवा फक्त तोफखाना) ब्रिगेड होत्या. मात्र 'रुद्र' ब्रिगेडमध्ये विविध लढाऊ दलांचा एकत्रित समावेश असेल. यामध्ये:
पायदळ (Infantry)
मेकॅनाइज्ड इन्फंट्री (Mechanised Infantry)
चिलखती दल (Armored Units)
तोफखाना (Artillery)
विशेष दल (Special Forces)
मानवरहित हवाई प्रणाली (ड्रोन) (Unmanned Aerial Systems)
या सर्व दलांना आवश्यक लॉजिस्टिक्स आणि लढाऊ साहाय्य पुरवले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन इन्फंट्री ब्रिगेडचे रूपांतर 'रुद्र' ब्रिगेडमध्ये करण्यात आले आहे. या रचनेमुळे युद्धभूमीवर अधिक वेगाने आणि समन्वयाने कारवाई करणे शक्य होणार आहे.
जनरल द्विवेदी यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या इतर योजनांचीही माहिती दिली.
'भैरव' लाइट कमांडो बटालियन: सीमेवर शत्रूला धक्का देण्यासाठी 'भैरव' नावाच्या चपळ आणि घातक विशेष दलांची स्थापना करण्यात आली आहे.
ड्रोन प्लाटून: प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये आता ड्रोन प्लाटूनचा समावेश करण्यात आला आहे.
'दिव्यास्त्र' आणि 'लॉइटर म्युनिशन' बॅटरी: तोफखान्याची मारक क्षमता वाढवण्यासाठी 'दिव्यास्त्र बॅटरी' आणि 'लॉइटर म्युनिशन बॅटरी' तैनात केल्या आहेत.
स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली: लष्कराच्या हवाई संरक्षण दलाला (Army Air Defence) स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालींनी सुसज्ज केले जात आहे.
"या सर्व बदलांमुळे आपली ताकद अनेक पटींनी वाढेल," असा विश्वास जनरल द्विवेदी यांनी व्यक्त केला.
लष्करप्रमुखांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत पाकिस्तानला थेट आणि स्पष्ट संदेश दिला. पहलगाम येथे 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा संदर्भ देत ते म्हणाले, "पहलगाममधील भ्याड हल्ला संपूर्ण देशासाठी एक मोठी जखम होती. पण यावेळी भारताने केवळ शोक व्यक्त केला नाही, तर निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला."
ते पुढे म्हणाले, "6-7 मे च्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हल्ला केला, ज्यात कोणत्याही निष्पाप नागरिकाला इजा झाली नाही. हे केवळ प्रत्युत्तर नव्हते, तर एक स्पष्ट संदेश होता की, 'दहशतवादाला आश्रय देणारे आता सुटणार नाहीत'."
या कारवाईत लष्कर, हवाई दल, नौदल आणि इतर सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे काम केले. भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला किंवा जनतेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शक्तीला चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे आणि भविष्यातही दिले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.