

Piyush Goyal on Prada controversy Kolhapuri chappal
नवी दिल्ली: इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड 'प्राडा'ने (Prada) आपल्या नव्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चपलेपासून प्रेरित डिझाइन वापरल्याने निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
"कोल्हापुरी चपलेच्या डिझाइनचे योग्य श्रेय भारतालाच मिळेल याची आम्ही खात्री करू," असे आश्वासन गोयल यांनी दिले आहे. या प्रकरणानंतर वाणिज्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलली असून, भारताच्या बौद्धिक संपदेचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जून 2025 मध्ये, इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडने पुरुषांसाठी आपले 'स्प्रिंग/समर 2026' कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने घातलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन हुबेहूब महाराष्ट्राच्या अस्सल कोल्हापुरी चपलेसारखे होते.
मात्र, प्राडाने सुरुवातीला या उत्पादनाचे वर्णन केवळ 'ओपन-टो लेदर सँडल्स' असे केले आणि त्यात भारतीय किंवा कोल्हापुरी चपलेचा कोणताही उल्लेख केला नाही.
या प्रकारानंतर भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील कारागिरांनी आणि सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोल्हापुरी चप्पल हे भौगोलिक मानांकन (Geographical Indication - GI) प्राप्त उत्पादन असल्याने प्राडाने डिझाइनची नक्कल करून जीआय हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला.
वाढता विरोध आणि टीका लक्षात घेता, प्राडाने अखेर आपली भूमिका बदलली. "आमच्या नव्या सँडल्सचे डिझाइन हे भारतीय हस्तकलेतून साकारलेल्या कोल्हापुरी चपलेपासून 'प्रेरित' आहे," असे स्पष्टीकरण प्राडाने दिले.
मात्र, त्यांनी हेही नमूद केले की, "फॅशन शोमध्ये दाखवण्यात आलेली ही सँडल्स अजूनही डिझाइनच्या टप्प्यात असून, ती व्यावसायिक उत्पादनासाठी निश्चित झालेली नाहीत."
या वादावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "जेव्हा एका जागतिक ब्रँडने आमच्या कोल्हापुरी चपलेचे डिझाइन वापरले, तेव्हा वाणिज्य मंत्रालयाने यावर तात्काळ कारवाई केली.
कोल्हापुरी चप्पल हे भारताचे जीआय मानांकन असलेले उत्पादन आहे. त्यामुळे जेव्हा या चपलेची निर्यात केली जाईल, तेव्हा भारताला त्याच्या डिझाइनचे योग्य श्रेय मिळेल."
नुकत्याच युनायटेड किंगडमसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे (FTA) भारताला आपल्या उत्पादनांसाठी जागतिक स्तरावर योग्य श्रेय मिळवणे सोपे होईल, असेही त्यांनी सूचित केले.
पियुष गोयल यांनी या वादातून एक सकारात्मक संधी निर्माण झाल्याचेही सांगितले. ते म्हणाले, "अनेक जागतिक ब्रँड्स आता भारतीय उत्पादनांशी आपले नाव जोडण्यास आणि ती उत्पादने जागतिक बाजारपेठेत विकण्यास उत्सुक आहेत.
कोल्हापुरी चपलेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 8000 ते 10000 कोटी रुपयांची उलाढाल करण्याची प्रचंड क्षमता आहे."
या प्रकरणामुळे कोल्हापुरी चपलेला अनपेक्षितपणे जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे आणि आश्वासनामुळे आता या पारंपरिक उत्पादनाला आणि त्याच्या कारागिरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ ओळखच नव्हे, तर आर्थिक फायदाही मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
यापुढे भारतीय उत्पादनांच्या बौद्धिक आणि भौगोलिक हक्कांचे संरक्षण करण्यावर सरकार अधिक भर देणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.