देशातील २९ जिल्ह्यांमधील कोरोनास्थिती चिंताजनक | पुढारी

देशातील २९ जिल्ह्यांमधील कोरोनास्थिती चिंताजनक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगासमोर कोरोना महारोगराईच्या चौथ्या लाटेचे महासंकट उभे आहे. अमेरिका, ब्राजील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रूस, इटली, फ्रांन्स, जापान,थायलंड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया मध्ये चौथ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. अशात भारतातील कोरोनाबाधितांची संख्या देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील २९ जिल्ह्यांमध्ये कोरोनास्थिती हाताबाहेर गेली आहे. या जिल्ह्यांचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या २८ दिवसांमध्ये ५ हजार ४७४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, ४० हजार ८६६ कोरोनाबाधित आढळले. दिलासादायक बाब म्हणजे या चार आठवड्यांमध्ये ५८ हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.

केरळमधील १४ जिल्ह्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक दैनंदिन कोरोनासंसर्गदर नोंदवण्यात आला आहे. १०० पैकी १० लोक संसर्गग्रस्त आढळत असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे. मिझोरम मधील सात जिल्ह्यांचा संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक, तर तीन जिल्ह्यांचा ५ ते १० टक्क्यांदरम्यान नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्रामचा संसर्गदर ५.८१ टक्के आहे. मणिपुर आणि ओडिशातील प्रत्येकी एक जिल्ह्याचा कोरोनासंसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्याचा संसर्गदर १२.५% आहे.

मंगळवारी ११ एप्रिल रोजी देशात ७९६ कोरोनाबाधित आढळले होते. पंरतु, गुजरात, दिल्ली आणि हरियाणाच्या कोरोनारुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत गुजरात मध्ये ४२.४ टक्के, दिल्ली ३४.९ टक्के आणि हरियाणात १८.१ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

२२ ते २८ मार्च दरम्यान सर्वाधिक कोरोनामृत्यू

गत महिन्यात १५ ते २१ मार्च पर्यंत देशात ४७१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. पंरतु, यानंतर एका आठवड्यात २२ ते २८ मार्च दरम्यान कोरोनाने ४ हजार ४६५ रुग्णांचा बळी घेतला. २५ मार्चला सर्वाधिक ४ हजार १०० मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सर्वाधिक ४ हजार ७ मृत्यू महाराष्ट्र, तर ८१ मृत्यू केरळमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. जुन्या मृत्यूची नोंद घेण्यात आल्याने हा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान ३१५, तर ५ ते ११ एप्रिल दरम्यान २२३ कोरोनामृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button