नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : गोंदे सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या पार पडत आहे. माघारीनंतर सोमवारी (दि.11) चिन्हवाटपाचा कार्यक्रम होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारीच गायब असल्याने दुपारी 3.30 पर्यंत उमेदवार ताटकळत होते.
त्याचे झाले असे, गोंदे सोसायटीच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी व माघारीची प्रक्रिया आदी टप्पे पार पडल्यानंतर सोमवारी चिन्हवाटप करण्यात येणार होते. यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत वेळ देण्यात आली होती. उमेदवार व सभासद चिन्ह घेण्यासाठी दुपारी 1 वाजता सिन्नरच्या सहायक निबंधक कार्यालयात दाखल झाले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारीच नसल्याने त्यांनी प्रतीक्षा केली. दुपारी तीन वाजून गेल्यानंतरही अधिकारी येत नसल्याने सभासद व उमेदवार संतप्त झाले. त्यांनी सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. तथापि, निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नेमणुका जिल्हा निबंधक कार्यालयाकडून होत असल्याने याबाबत तिथेच विचारणा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक अधिकार्याचा फोनही लागत नव्हता. काही उमेदवारांनी थेट जिल्हा निबंधक कार्यालयातील अधिकार्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीही हात वर केले. त्यामुळे सभासद व उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच निवडणूक अधिकार्यांची तिथे 'एन्ट्री' झाली. त्यांनी सभासदांना झापायला सुरुवात केली. 'तुमची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आम्ही सहकार्य करतो आणि तुम्ही आमची बदनामी करता' असे म्हणूत सभासदांना गार केले. त्यांचे आक्षेप असलेल्या मुद्द्यांना खास शैलीत उत्तरे दिली. निवडणूक प्रक्रियेत सहाय करणार्या सचिवालादेखील धारेवर धरले. मग, इतका वेळ लालबुंद झालेले गोंदेकर सभासदही थंडगार झाले. त्यानंतर चिन्ह वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
आमच्याकडे निवडणुकीची बरीच कामे आहेत. याचसंदर्भाने इगतपुरी तालुक्यात गेलो होतो. सभासदांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळ मागितली होता. त्यामुळे त्यांना वेळ देण्यात आली होती. – आर. बी. त्रिभुवन, निवडणूक निर्णय अधिकारी