‘धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, हृदयविकाराचा धक्का नाही, भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल’ | पुढारी

'धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, हृदयविकाराचा धक्का नाही, भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल'

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे, अशी माहती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून, सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचेही पवार म्हणाले. आज सकाळी अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन – चार दिवसांत त्यांना आराम मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. रुग्णालयाच्या वतीने डॉ. प्रतीत समदानी यांनी अधिक माहिती दिली.

काल धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर ते शरद पवार यांनाही भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदींनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनीही धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले.

मुंडे हे सोमवारी दिवसभर बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. मंगळवारी ते मुंबईत होते. सायंकाळी साडे सहा वाजता ते जनता दरबार आटोपून निवासस्थानाकडे निघाले असता त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कारण नाही, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीसाठी रुग्णालयात रहावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 हे ही वाचा :

Back to top button