

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि गुजरात येथे मागील काही दिवसांत कोरोनाचे एक्सई व्हेरियंट (XE covid variant) प्रकाराचे रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर सदर प्रकाराच्या अनुषंगाने भीती बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनचे (NTAGI) प्रमुख एन. के. अरोरा (NK Arora) यांनी सोमवारी दिले आहे.
घातक असलेल्या ओमायक्रॉन स्ट्रेनमधील एक्स सीरिजच्या (X series) काही प्रकारांनी अनेक देशांतील चिंता वाढविलेली आहे. भारतातही एक्सई (XE) प्रकाराचे विषाणू आढळले आहेत. ओमायक्रॉन विषाणू अनेक प्रकारांना जन्म देत आहे. एक्सई प्रकार हा त्यातलाच एक आहे. हा वेगाने पसरत नसल्याचे अरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
भारतीय आकडेवारीचा विचार केला तर एक्सई प्रकारचे विषाणू फार वेगाने वाढत नसल्याचे दिसून आले आहे. दोन लस घेतलेल्या मुंबईमधील एका व्यक्तीमध्ये एक्सई प्रकारचा विषाणू आढळून आला होता. दुसरीकडे गुजरातमध्येही याच प्रकारचे विषाणू असलेला एक रुग्ण आढळला होता.