महागाईच्या चर्चेपासून सरकारने काढला पळ : मल्लिकार्जुन खर्गे | पुढारी

महागाईच्या चर्चेपासून सरकारने काढला पळ : मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नियोजित वेळेच्या एक दिवस आधी संपले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस मुख्यालयात माध्यमांशी बोलताना म्‍हणाले, “निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. आता निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच हे सरकार जनतेचा आवाज दाबण्याचे काम करत आहे. सरकार वाढत्‍या महागाईच्या चर्चेपासून पळ काढत आहे.”

आम्ही ज्‍यावेळी महागाईवर सभागृहात चर्चेची मागणी केली, तेव्हा सरकारकडून ही मागणी पुढे ढकलली जाते. महागाईची जर चर्चा झाली तर सरकारचे पोल उघडे होईल, हे त्‍यांना माहीत आहे. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. अधिवेशन हे शुक्रवारपर्यंत सुरू ठेवण्याचा अजेंडा होता, मात्र अचानक एक दिवस आधी ते तहकूब करण्यात आले. यावरून गरिबांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, हे स्पष्ट दिसून येते, असेही खर्गे म्‍हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “सरकारकडून महागाईवर चर्चा होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दररोज दर पाहता ही चर्चा सरकारला जड जाईल. तसेच, अर्थमंत्र्यांनी सभागृहात दावा केला होता की, रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची खरेदी करण्यात येणार आहे. परंतु दररोज तेलाच्या किंमतीमध्ये का वाढ होत आहे? तर संसदेत 129 टक्के उत्पादकता राहिल्याचा सरकारला आनंद आहे.”

हेही वाचा : 

Back to top button