Sanjay Raut : आयएनएस विक्रांतचा पैसा पीएमसी बॅंकेतून चलनात; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप | पुढारी

Sanjay Raut : आयएनएस विक्रांतचा पैसा पीएमसी बॅंकेतून चलनात; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी जमा केला होता. त्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. सोमय्या यांच्या नीलम नगरमधील कार्यालयात आयएनएस विक्रांतसाठी जमा झालेला पैसा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तेथून तो वितरीत करण्यात आला तसेच पीएमसी बॅंकेत या काळ्या पैशाला व्हाईट करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा पैसा सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला.

पीएमसी बॅंकेतून हा पैसा व्हॉईट करीत चलनात आणण्यात आला आणि नील किरीट सोमय्यांच्या व्यवसायात उपयोगात आणण्यात आला, असा आरोप देखील राऊत यांनी केला. पैसा जमा करण्यासाठी ७११ मोठे बॉक्सेस तयार करण्यात आले होते. हा सगळा प्रकार मनी लाँड्रिंगचा असू शकतो. ईडी ही केंद्रीय संस्था भाजपची बटीक नसेल तर या प्रकरणी सोमय्यांवर कारवाई करतील असेही राऊत यांनी म्हटले. या प्रकरणाचे पुरावे मागितले जात आहे, पंरतु, गोळा करण्यात आलेल्या पैशांचा व्यवहार अगोदर दाखवा त्यानंतर पुरावे देईन, असे आव्हान देखील राऊत यांच्याकडून देण्यात आले आहे.

सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे.पंरतु, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली.फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. मोहन भागवत यांना देखील वाईट वाटत असेल असेही राऊत यांनी म्हणाले. आयएनएस विक्रांतच्या या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरातून पैसे जमा केले.आयएनएस विक्रांतसाठी ठरवण्यात आलेल्या २०० कोटीपेक्षाही अधिक पैसे जमा झाले असल्याचा दावा राऊत यांनी केला.

कधी गंगाजल,कधी राम मंदिराच्या नावाखाली पैसे जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचा स्वाभिमान असणाऱ्या आयएनएस विक्रांतच्या नावाखाली निधी जमवला आणि अपहार केला. देशभक्ती, हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मुर्ख बनवणाऱ्या भाजप नेत्यांचे मुखवटे गळून पडले असून आता भविष्यात असे आणखी घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभरात गाजणार. शिवसेनेने राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला. महाराष्ट्रात या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोह्यांना तुरुंगात टाकू. आयएनएस विक्रांत भंगारात जरी घालवली असली तरी हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष अरबी समुद्रात बुडवल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

हेही वाचलत का ?

Back to top button