नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह | पुढारी

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात तीन महिला डॉक्टर म्हणून फिरत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधीही रुग्णालयात दिवसा व रात्री अज्ञात व्यक्ती बिनदिक्कत रुग्णालयात वावर करताना आढळून आले आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना, भुरट्या चोरट्यांचा त्रास रुग्ण व नातलगांना बसत असून वाहन चोरीही नित्याच्याच झाल्या आहेत. तरीदेखील रुग्णालयातील सुरक्षीततेबाबत योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

शहरातील जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण तपासणी व उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्ण व नातलगांची तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वर्दळ कायम असते. त्यामुळे सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. मात्र या सुरक्षेच्या उपाययोजना तोकड्या असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. कोरोना प्रादुर्भाव असताना फेब्रुवारी २०२१ मध्ये एका व्यक्तीने चिमुकलीचे अपहरण केले होते. सुदैवाने ही चिमुकली सापडली. या घटनेतील अपहरणकर्ताही बिनदिक्कत रुग्णालयात शिरल्याचे आढळून आले होते. सुरक्षारक्षकांकडून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी होत नसल्याने किंवा रुग्णालयातील विविध कक्षांची नियमीत तपासणी होत नसल्याने कोणालाही रुग्णालयात सहज वावरता येत असल्याचे चित्र आहे.

रुग्णालयाच्या परिसरातही हेच चित्र दिसते. रुग्णालयाच्या परिसरात वाहनतळासाठी सुरक्षारक्षक नेमलेले असतानाही या ठिकाणी बाहेरगावी जाणारे किंवा कोणीही वाहने पार्क करून जातात. तर चोरटेही वाहने चोरून नेत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. भुरट्या चोरट्यांचा वावर नेहमीचाच झाला असून त्यांच्याकडूनही चोरीच्या घटना घडत असल्याने त्याचा फटका सर्वांना बसतो. तिन महिला डॉक्टर बनून रुग्णालयात वावरत असल्याचेही प्रकरण गंभीर होते. बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांचा वावर असतो. तरीदेखील या महिला बिनदिक्कतपणे वावरत असल्याने सुरक्षीततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button