पुढारी ऑनलाईन डेस्क : इम्रान खान सरकारला पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने आज मोठा झटका दिला. तीन एप्रिल रोजी संसदेच्या उपाध्यक्षांनी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील जियो न्यूज आणि दैनिक डॉनने दिले आहे. दरम्यान, याप्रश्नी अंतिम निर्णय सुनावला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सुनावणीवेळी सर्वप्रथम राष्ट्रपती आरिफ अल्वी यांचे वकील अली जफर यांनी युक्तीवाद केला. यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले की, सर्व काही घटनेनुसारच सुरु असेल तर ; मग संकट कोठे आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळणे हा घटनेतील अनुच्छेद ९५ चे उल्लंघन आहे. आता तुम्ही निवडणूक घेण्यास गेला तर अब्जावधी रुपयांचा खर्च आहे, अशा शब्दात न्यायालयाने इम्रान खान सरकारला फटकारले.
आता विरोधी पक्षांचे सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाकडे लक्ष लागले आहे. याप्रश्नी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहनही विरोधी पक्षाच्य वकिलांनी केले आहे. यावेळी इम्रान खान यांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण हे संसदेतील आहे. तसेच ३ एप्रिल रोजी उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे घटनेनुसार घेण्यात आला आहे.
'द एक्सप्रेस ट्रिब्यून'मधील रिपोर्टनुसार, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्याने अमेरिकेचे नाव घेत टीका केली. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार आणि नेता सत्तेत येतात आणि जातात मात्र इम्रान खान सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला आहे याचे मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :