जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना परत देण्यास अजित पवारांचा विरोध का?; सोमय्यांचा सवाल

जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना परत देण्यास अजित पवारांचा विरोध का?; सोमय्यांचा सवाल

मुंबई; पुढारी ऑनलाईन

जरंडेश्वर साखर कारखाना प्रश्नी आज भाजप नेते किरीट सोमय्या आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंड‍ळ‍ाने ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या भेटीचे कारण स्पष्ट केले. जरंडेश्वर कारखान्याशी अजित पवारांचा संबंध नाही तर बोलता कशाला? असा सवाल सोमय्यांनी केला. शेतकऱ्यांना कारखाना परत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना परत देण्यात अजित पवारांचा विरोध का? असेही त्यांनी म्हटले आहे.

ईडी अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी सोमय्या यांच्यासोबत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ सोबत होते. यावेळी सभासदांच्या वतीने बोलताना पोपटराव जगदाळे म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा बेकादेशीर लिलाव झाला. त्यासाठी आम्ही १२ वर्षे कोर्टात लढा देत आहोत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ईडीने चौकशी केली. या प्रकरणी न्याय मि‍ळवून देण्यासाठी आम्ही सोमय्यांना विनंती केली. सोमय्यांनी मदत केली. ईडीकडे हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर आहे. जरंडेश्वर कारखाना २७ हजार सभासदांचा आहे. तो सभासदांकडून काढून घेण्यात आला होता. तो आम्हाला परत द्यावा, असे मत त्यांनी मांडले.

कारखान्याचे व्हाइस चेअरमन म्हणाले की कारखाना परत मिळेल याची आम्हाला आज खात्री मिळाली आहे. अन्यायकारक पद्धतीने तो ताब्यात घेतला होता.

दरम्यान, आर्थिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकरणाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित सातारा जिल्ह्यातील ६५ कोटी रुपयांचा जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. प्राधिकरणाच्या आदेशाची रीतसर प्रत मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी) लवकरच कारखान्याचा ताबा घेणार आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये या साखर कारखान्यावर टाच आणली होती. या कारवाईला प्राधिकरणाने मंगळवारी पुष्टी दिल्यामुळे संबंधित कारखाना ताब्यात घेण्याचा 'ईडी'चा मार्ग मोकळा झाला आहे. प्राधिकरणाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 'ईडी' तो कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

राज्य सहकारी बँकेने २०१० मध्ये कमी किमतीत कारखान्याचा लिलाव केला होता, असे 'ईडी'ला आढळून आले होते. अजित पवार हे त्यावेळी राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांपैकी एक होते.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news