शरद पवार म्हणाले, "मविआ सरकारला कोणताही धोका नाही, ते ५ वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील" | पुढारी

शरद पवार म्हणाले, "मविआ सरकारला कोणताही धोका नाही, ते ५ वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : “राष्ट्रवादी भाजपासोबत कधीच नव्हती. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही. नवाब मलिकांवरील कारवाईसंदर्भात कोणतीही चर्चा  केली नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही भाजपाविरोधात उभे आहेत. सध्या राज्याच्या मंत्रीमंडळात कोणतेही बदल करण्‍यात येणार नाहीत. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, ते ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करून पुन्हा सत्तेत येतील”, असाही विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

या वेळी शरद पवार म्‍हणाले की, “महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍याशी कोणतीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचाही मुद्दा मांडला. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज नव्हती. त्याचबरोबर राज्यपालांकडे प्रलंबित असणाऱ्या १२ आमदारांच्या मुद्दा मोदींसमोर मांडला. त्यावर मोदी विचार करून योग्य निर्णय घेतील.”  राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या व्यक्तव्यावर पवार म्‍हणाले, “राज ठाकरे हे भाजपाविरोधी होते, ते आता बदलत आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली . यावेळी २० ते २५ मिनिटे झाल्याची चर्चा आहे. या भेटीवर राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर यांनी आपापला अंदाज माध्यमांसमोर व्यक्त केला हाेते. दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते जेलमध्ये आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडी कमालीची सक्रीय झाली आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने ईडीचा उल्लेख होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, तर आगामी काही दिवसांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जेलमध्ये असतील असे थेट वक्तव्य केले आहे, या सर्व पार्श्वभूमीवर विविध चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचलं का?

Back to top button