मुंबई ; सुरेश पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभयतांची 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत सर्वसाधारण विषयांवर चर्चा झाली, असे सांगण्यात येत असले; तरी शरद पवार यांचे बोलणे आणि करणे यात तफावत असते, हा अनेकवेळचा अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या भेटीने संशयकल्लोळ निर्माण झाला, तर आश्चर्य करायला नको.
पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्यावरील 'ईडी'च्या कारवाईचा मुद्दा मांडला. विधान परिषदेतील बारा रिक्त जागा भरावयाच्या आहेत व त्या प्रस्तावावर राज्यपालांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नसल्याचे निदर्शनास आणले, अशी माहिती पवार यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितली. लक्षद्वीप येथील प्रश्न मांडल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनगुंटीवारांचे सूचक वक्तव्य
आपल्या भेटीबाबत पवारांनी स्पष्टीकरण दिले; पण त्याचवेळी भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली टिपणी बोलकी आहे. आमची कटुता शिवसेनेशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी नाही, असे सूचक उद्गार मुनगंटीवार यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्याने शरद पवार यांच्या या भेटीमागे नेमके काय, अशा चर्चेला अधिकच हवा मिळाली आहे.
2014 साली भाजपने विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकल्या. बहुमतासाठी भाजपला 23 जागा कमी पडल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध ठेवले आहेत आणि मोदी यांच्याविषयी त्यांनी प्रशंसोद्गारही काढले आहेत. मोदी यांनी पवार यांच्या बारामती येथील कृषी प्रदर्शनाला 2018 सालच्या फेब्रुवारीत भेट दिली होती आणि त्याबद्दल कौतुकोद्गार काढले होते.
सहकार्यांवरील कारवायांमुळे शरद पवार संत्रस्त?
महाविकास आघाडीचे सूत्रधार म्हणून पंतप्रधानांची भेट घेऊन पवारांनी आघाडीचे प्रश्न मांडले, हे खरे; पण बंद दाराआड काय झाले, याचा काही थांगपत्ता लागू शकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक या मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी करडी कमान धरली आहे आणि शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांची या यंत्रणांनी चांगलीच कोंडी केली आहे. आपल्या सहकार्यांवरील कारवायांमुळे पवार संत्रस्त असल्याचे बोलले जाते.
शिवसेनेची संगत धरल्यामुळे आपल्यावर ही आफत आली आहे का, अशीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही गटांतील चर्चा आहे. केंद्रीय यंत्रणांच्या तडाख्यातून आपल्या पक्षाच्या नेत्यांची सुटका व्हावी, हाही या भेटीमागे उद्देश असू शकतो. त्या बदल्यातही काही परस्पर सहकार्याचा विषय झाला असू शकतो, अशीही चर्चा आहे. शरद पवार जे बोलून दाखवतात, त्यामागे प्रत्यक्षात वेगळेच काही असते, हा अनुभव जमेस धरता आताही त्याची पुनरावृत्ती झाली, तर त्यात नवल वाटायचे कारण नाही.
संशयकल्लोळ
शरद पवार नेमके कोणते पाऊल उचलतील, हे सांगणे कठीणच आहे; पण गेल्या सहा महिन्यांतील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया लक्षात घेता, त्यातून काही मार्ग निघावा, यासाठी त्यांनी काही डावपेच लढवले असावेत, अशीही जाणकारांत चर्चा आहे. काहीही असले तरी त्यांच्या या भेटीमुळे संशयकल्लोळ उद्भवला आहे, एवढे मात्र खरे आहे!