सोशल मीडियावर 'हिरोगिरी' करणार्‍या देवा डॉन याचा झाला 'फिल्‍मी स्‍टाईल' मर्डर | पुढारी

सोशल मीडियावर 'हिरोगिरी' करणार्‍या देवा डॉन याचा झाला 'फिल्‍मी स्‍टाईल' मर्डर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : त्‍याची लाईफस्‍टाइल ही फिल्‍मी हिरोप्रमाणे होती. तो सोशल मीडियावरही बराच फेमसही होता. त्‍याचे सुमारे दोन लाख फॉलोअर्स होते. तो नियमित स्‍टंट आणि मारहाणीचे व्‍हिडीओ शेअर करत असे. दोन बायका आणि ९ मुलं असा त्‍याचे कुटुंब होतं. कोठेही गेला तरी कॅमेरामनसह त्‍याचा ताफा त्‍याच्‍याबरोबर असे. काही परिसरात त्‍याने अशी दहशत होती की रस्‍त्‍यावरुन जाणारे त्‍याला नमस्‍कार करत असत. त्‍याने माजवलेल्‍या दहशतीचे अनेक किस्‍से कोटा परिसरातील तरुणाई चवीने चघळत असे. त्‍यामुळे गल्‍लीतील गुंड त्‍याला आपला हिरो मानत. अखेर त्‍याचा मर्डरही फिल्‍मी स्‍टाईलच झाला. स्‍वत:ला डॉन समजणार्‍या राजस्‍थानमधील गँगस्‍टर देवा गुर्जर याच्‍या खूनानंतर त्‍याची फिल्‍मी ‘लाईफस्‍टाईल’ हा सध्‍या राजस्‍थानमधील चर्चेचा विषय ठरला आहे.

देवासोबत असायचा कॅमेरामॅन, दहशत माजविणार्‍या शॉर्ट फिल्‍म तयार करायचा

राजस्‍थानमधील रेकॉर्डवरील गुन्‍हेगार देवा गुर्जर उर्फ देवा डॉन याची हत्‍या एका सलूनमध्‍ये झाली. लुटमार, खंडणी वसुली, हाणामारी प्रकरणी त्‍याच्‍याविरोधात कोटामधील आरके पुरम पोलिस ठाण्‍यात अनेक गुन्‍हे दाखल आहेत. तसेच चितोडगड पोलिस ठाण्‍यातही त्‍याच्‍याविरोधात अनेक गुन्‍हे दाखल झाले आहेत. देवा याच्‍या टोळीत सुमारे ५० जण होते. त्‍याने सोशल मीडियावर देवा डॉन नावाने फॅन पेजही बनवले होते. तो नेहमी आपल्‍यासोबत एक कॅमेरामॅन ठेवत असते. तो स्‍वत:च्‍या गुन्‍ह्याचीच शॉर्ट फिल्‍म करायचा. यातील व्‍हिडीओ व्‍हायरल करुन तो कोटा परिसरात दहशत माजवत असे.

दोन पत्‍नी, आठ मुली आणि एक मुलगा

सोशल मीडियावर स्‍वत:ची हवा करणारा देवा गुर्जर याने दोन लग्‍न केली. त्‍याला आठ मुली आणि एक मुलगा आहे. सर्वजण एकत्र राहत असत. दोन पत्‍नी आणि मुलांसह तो व्‍हिडीओ आणि रील्‍स तयार करायचा. दोन्‍ही पत्‍नीसोबत मॉलमध्‍ये खरेदी करतानाचे आणि सण साजरा करतानचे व्‍हिडीओही तो सोशल मीडियावर शेअर करत असे. सुमारे दोन लाख फॉलोअर्स होते

१० दिवसांपूर्वीच व्‍यक्‍त केला होता हत्‍या होण्‍याचा संशय

देवा गुर्जर याने १० दिवसांपूर्वीच आपली हत्‍या केली जाईल, असा संशय व्‍यक्‍त केला होता. त्‍याने कोटामधील आरके पुरम पोलिस ठाण्‍यात याची तक्रारही केली होती. देवा रावतभाटा प्‍लांटमध्‍ये कामगार पुरविण्‍याचेही काम करत असे. येथील ठेका घेवू नये यासाठी त्‍याला २३ मार्च रोजी फोन आला. याचवेळी त्‍याला जीवे मारण्‍याची धमकी देण्‍यात आली होती.

मित्रानेच काढला काटा?

२०१५ मध्‍ये देवा गुर्जरने तीन साथीदारांच्‍या मदतीने एका प्रकरणातील साक्षीदार कैलास धाकड याला बेदत मारहाण केली होती. याचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल केला होता. माझ्‍याविरोधात न्‍यायालयात साक्ष देणार्‍याला हीच शिक्षा दिली जाईल, अशी धमकीही त्‍याने या वेळी दिली होती. रावतभाटा परिसरात त्‍याची दहशत होती. सोमवारी ( दि. ४ ) कोटामधील एका सलूनमध्‍ये तो आपल्‍या साथीदारांसह बसलh होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्‍या जमावाने देवा गुर्जरवर हल्‍ला केला. त्‍याला काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यानंतर त्‍याच्‍यावर गोळीबार करत त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची खात्री करुनच जमाव पसार झाला. देवा गुर्ज याचा खूनात त्‍याचा मित्रच सहभागी असावा, असा संशय स्‍थानिक पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

देवा गुर्जरच्‍या खुनानंतर समर्थकांचा धिंगाणा

 violencewww.pudharinews

देवा गुर्जर यांचा खून झाल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍याचे समर्थक कोटा-रावतभाटा रस्‍त्‍यावर जमले. त्‍यांनी रास्‍तारोको करत एक बस पेटवून दिली. तसेच काही वाहनांची तोडफोडही केली. मारेकर्‍यांना तत्‍काळ अटक करा, अशी मागणी करत रस्‍त्‍यावर धुडगूस घातला. पाच लाखांच्‍या नुकसान भरपाईसह विविध मागण्‍या केल्‍या. देवा गुर्जर याच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत, सर्व आरोपींवर खुनाचा गुन्‍हा दाखल करणे, देवा गुर्जर याच्‍या कुटुंबातील एकाला नोकरी अशा मागण्‍या मान्‍य केल्‍याचे पोलिसांनी सांगितल्‍यानंतर त्‍याच्‍या समर्थकांनी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचलं का?

Back to top button